वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निम्म्या महाराष्ट्रात अंधार

वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निम्म्या महाराष्ट्रात अंधार

मुंबई – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती महामंडळाच्या खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे मुंबईसह अनेक शहरांत वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक शहरांत बत्तीगुल झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्याकरता सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे.

या संपामुळे मुंबई, पुणे या मेट्रो शहरांत तर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि भंडाऱ्यात वीज कर्मचारी रस्त्यावर उतरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

कर्मचाऱ्यांवर मेम्सा लावणार

मध्यरात्री 12 वाजल्यापासून महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने या सर्व संघटनांना नोटीस दिली आहे. यात त्यांनी मेस्मा लावणार असल्याचे सांगितले आहे. या अत्यावश्यक सुविधेत अडचण निर्माण करून वीज कर्मचारी संपावर जात असतील तर त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

सरकारचं युद्धपातळीवर काम

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणने नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पर्यायी व्यवस्था

वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे. वीज परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ आणि मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी २४ तास संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने नियुक्त केलेल्या संस्थांचे (एजन्सी) कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता आणि कर्मचाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे.

First Published on: January 4, 2023 3:59 PM
Exit mobile version