दौलताबाद किल्ल्याचे ८०० वर्षांनी पुन्हा होणार नामकरण; काय आहे इतिहास?

दौलताबाद किल्ल्याचे ८०० वर्षांनी पुन्हा होणार नामकरण; काय आहे इतिहास?

मुंबई – औरंगाबाद आणि उस्मानबादचं नाव बदलल्यानंतर महाराष्ट्र सरकार आता दौलताबाद किल्ल्याचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे. दौलताबद किल्ल्याचं नाव देवगिरी ठेवण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुनही याबाबत ट्विट करण्यात आले आहे. या किल्ल्याचं नाव सुरुवातीला देवगिरीच होतं. त्यामुळे परकीयांच्या आक्रमणाची आठवण पुसून काढण्याकरता दौलताबाद किल्लयाचं नाव ८०० वर्षांनी बदलून देवगिरी ठेवण्यात येणार आहे.

“होय हे हिंदुत्त्ववादी सरकार आहे. ज्याप्रमाणे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, त्याप्रमाणे दौलताबाद किल्ल्याचे नाव देवगिरी केले जाईल,” असं भाजपा महाराष्ट्रने ट्विट केलं आहे.


दरम्यान, महाविकास सरकारच्या काळात औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर शिंदे-फडणवीस सरकारने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानंतर, आता दौलताबाद किल्ल्याचं नाव देवगिरी ठेवण्यात येणार आहे.

काय आहे इतिहास

औरंगाबाद शहरापासून अवघ्या १३ किमी अंतरावर दौलताबाद किल्ला आहे. हा किल्ला मध्ययुगीन काळातील असून जे काही किल्ले चांगले जतन करून ठेवले आहेत, त्यापैकी हा एक किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे यादव राजांची राजधानी होता. राजा भिल्लमराजा याने दौलताबाद किल्ला बांधला असल्याचा दाखला इतिहासात आहे. ११८७ साली या किल्ल्याचे नामकरण देवगिरी असे करण्यात आले होते. वेडा महम्मद म्हणून ज्याचा इतिहासात उल्लेख केला जातो त्यानेच तेराशेच्या शतकात देवगिरी किल्ल्याचं नाव दौलताबाद असं केलं, असा इतिहासात दाखला आहे. त्यानं आपली राजधानी दिल्लीतून हलवून दौलताबादला नेली. दिल्ली ते दौलताबादला स्थलांतर होताना अनेक महिला, मुले, वृद्ध रस्त्यातच मरण पावली. परंतु, या किल्ल्यावर पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने तो पुन्हा दिल्लीला रवाना झाला. त्यानंतर, बहामनी, मुघल, निजाम अशा अनेक राजघराण्यांनी या किल्ल्यावर राज्य केलं.

First Published on: September 19, 2022 2:43 PM
Exit mobile version