आळंदीमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; मंदिरालगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

आळंदीमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; मंदिरालगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

मंदिरालगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

आषाढी वारी पालखी सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला असताना श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या परिसरालगत राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंदिरालगतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून मंदिर परिसरात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

आळंदीमध्ये कोरोनाचा शिरकाव

‘गेल्या तीन महिन्यांपासून आळंदीमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंदिरा लगतचा परिसर कंन्टेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम प्रस्थान सोहळ्यावर देखील झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

१० जणांची प्रकृती अतिगंभीर

आळंदीमध्ये आठ ते दहा जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने रुग्ण अधिक प्रमाणात वाढू नयेत, याकरता खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच ही जबाबदारी वारकरी संप्रदाय आणि आळंदीच्या नागरिकांवर आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करुन आळंदीमध्ये प्रवेश केल्यास ज्या प्रकारे पंढरपूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे, तशीच कारवाई आळंदीमध्ये देखील करण्यात येईल, असा इशाराही प्रांतधिकारी तेली यांनी दिला आहे.

पायी वारी रद्द

उद्या, १२ जून रोजी तुकोबारायांची पालखी देहूतून तर शनिवारी १३ जूनला माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होणार आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या वाहनांनी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. यावेळी पालख्यांसोबत केवळ काही मोजकी मंडळीच असणार आहेत. नेहमीप्रमाणे दशमीला या पालख्या पंढरपूरात दाखल होणार आहेत.


हेही वाचा – लोणारचं जगप्रसिद्ध सरोवर गुलाबी का झालंय? वाचा शास्त्रीय कारण!


First Published on: June 11, 2020 2:30 PM
Exit mobile version