वारीशे मृत्यू प्रकरणात शरद पवार म्हणाले, “एका आठवड्यात तिथे…”

वारीशे मृत्यू प्रकरणात शरद पवार म्हणाले, “एका आठवड्यात तिथे…”

नाणार रिफायनरीविरुद्ध बातमी देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या प्रकरणावरून आता राजकारण तापू लागलंय. या प्रकरणात आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. रिफायनरीविरुद्ध बातमी दिल्यानेच वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप वारिशेंचे कुटुंबीय आणि आता विरोधक करु लागले आहेत. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. संजय राऊत, अजित पवार यांच्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “एका आठवड्यात तिथे पाच-सात असेच गुन्हे घडले, असं एका वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. हे काही चांगलं लक्षण नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेहमी चांगली असते. पण हल्ली त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे, ते कितपत लक्ष देतात यासंबंधिच्या शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्या संबंधिचं वृत्त छापून आलं आहे. आता पत्रकारांची सुद्धा ही अवस्था झाली, तर याचा अर्थ काय, राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे आता समजून घ्यावं लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. दररोज काहिना काहीतरी नवीन समोर येतंय. हल्ला आणि हत्या या प्रकारच्या बातम्या येत आहेत. किंवा रस्त्यावरचे अपघात, या दोन गोष्टी महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातलंय. “पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत असतात. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे पत्रकार वारिसे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे पाठिशी घातलं जाणार नाही. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणाले की, मला राजकीय वक्तव्याला उत्तर द्यायचे नाही, पण जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालू नका अशा सूचना दिल्या आहेत.

First Published on: February 11, 2023 5:40 PM
Exit mobile version