करोनाचा टेस्ट रिपोर्ट वेळेत न आल्याने नाशिकमधील बिल्डरचा मृत्य

करोनाचा टेस्ट रिपोर्ट वेळेत न आल्याने नाशिकमधील बिल्डरचा मृत्य

कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णांची हेळसांड करु नये असे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असताना त्याला छेद देत नाशिकमधील खासगी हॉस्पिटल्स तसेच महापालिकेचे डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटल आणि सिव्हिल यांनी एका रुग्णाची प्रचंड हेळसांड केली. व्यवसायाने बिल्डर असलेल्या या रुग्णात करोनाची लक्षणे असल्याचे सांगत त्यांचा स्वॅब रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आला. तोपर्यंत रुग्णावर योग्य उपचाराच न झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महत्वाचे म्हणजे मृत्यूनंतर रुग्णाच्या करोनाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या

कॅनरा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अन्वर मुजफ्फर सैयद (वय ६६) यांची आयुष्याची संध्याकाळ करोनाच्या भीतीच्या काळात संपली. त्यांना गेल्या बुधवारी सकाळी चक्कर आली. तसेच मळमळ होणे, तोल जाणे तसेच कोणाचीही ओळख न पटणे असा त्रास सुरु झाला. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना फेम थेअटर परिसरातील एका खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले.

अशी झाली रुग्णाची परवड :

कुटुंबियांनी त्यांना फेम थेअटर परिसरातील एका खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. मात्र त्यांना ताप असल्याने शासनाच्या नियमांकडे अंगुलीनिर्देश करीत व करोनाची भीती व्यक्त करीत उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर रुग्णाला पंचवटी परिसरातील दुसर्‍या एका बड्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र रुग्णात ताप आणि जुलाबाची लक्षणे असल्याचे बघून त्यांनी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. सैयद यांना कुटुबियांनी तत्काळ डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात नेले. मात्र रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांना व्हेंटिलेटर आणि आयसीयूची गरज असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार सैयद कुटुंबाने त्यांना सिव्हिलमध्ये नेले. मात्र  सिव्हिलमध्ये केवळ ग्रामीण भागातील रुग्ण दाखल केले जातात असे सांगत त्यांना पून्हा एकदा डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयाता रस्ता दाखवण्यात आला. अखेर डॉ. हुसैन हॉस्पिटलमध्येे त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. मात्र टेस्टचे रिपोर्ट येईपर्यंत येथे उपचार होऊ शकत नाही असे सांगून पून्हा एकदा व्हेंटिलेटर नसल्याचे कारण देत त्यांना सिव्हिलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी मात्र डॉ. हुसैन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सिव्हिलच्या नावाने पत्र देत सैयद यांना सिव्हिलमध्येच दाखल करण्याची सूचना केली. या पत्राच्या आधारे सैयद यांना दाखल करण्यात आले. या हेळसांडीत सैयद यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली. करोना प्रसाराचा धोका लक्षात घेत रुग्णालय प्रशासनाने कुटुंबियांना रुग्णालयात थांबण्यास मज्जाव केला. गुरुवारी दुपारी २.३० वाजता सैयद यांना हदय विकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. निधनानंतर करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेताना सैयद यांची प्रचंड हेळसांड झाली. त्यातच त्यांची प्रकृती खालावत केली. योग्य वेळी उपचार झाला असता तर आपल्या काकांचा प्राण वाचला असता असा दावा त्यांचा पुतण्या लियाकत सैयद यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केला.

 

करोनाच्या भीतीच्या वातावरणामुळे माझ्या काकांना कोणीही अ‍ॅडमिट करुन घेण्यास तयार नव्हते. प्रत्येकजण प्रशासकीय आदेशाकडे बोट दाखवत होता. योग्य वेळी योग्य उपचार न झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. रुग्णांची हेळसांड होता कामा नये अशा स्पष्ट सूचना असताना रुग्णालय प्रशासन करोनाच्या रिपोर्टची वाट बघत बसले. हा अहवाल लवकर आला असता तर त्यांचा जीव वाचला असता.
-लियाकत सैयद

First Published on: April 19, 2020 11:47 PM
Exit mobile version