तहसीलदारावर कारवाईची मागणी, पुण्यात तरूणाचे पुलावर चढून शोले स्टाईल आंदोलन

तहसीलदारावर कारवाईची मागणी, पुण्यात तरूणाचे पुलावर चढून शोले स्टाईल आंदोलन

पुण्यामधील जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील महेंद्र देवकर या तरूणाने जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली होती.

पुण्यामधील जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील महेंद्र देवकर या तरूणाने जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली होती. या मागणीसाठी या तरूणाने संचेती रुग्णालयाच्या समोरील पुलावर आंदोलन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार अर्ज देऊन सुद्धा जमिनीच्या खातेदाराच्या नावाच्या नोंदणी न केल्यामुळे महेंद्र देवकर या तरुणाने अखेरीस तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी या पुलाच्या खाली उतरणार नाही. मी पुलावरून उडी मारणार, अशी भूमिका महेंद्र देवकर याने घेतली, ज्यामुळे पुणेकरांना आज शहराच्या मधोमध शोले स्टाईल आंदोलन पाहायला मिळाले.

हेही वाचा – शहापुरात २०४ टंचाईग्रस्त गावपाड्यांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

आज (ता. 30 मे) दुपारी साडेचारच्या सुमारास महेंद्र देवकर हा तरुण संचेती रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या पुलावर चढला. हा तरुण नेमकं कशासाठी पुलावर चढला? हे त्यावेळी कोणालाही कळू शकले नाही. परंतु काही वेळानंतर त्याने त्याची मागणी मोठ्याने सगळ्यांना सांगितली. जुन्नरच्या तहसीलदारांवर कारवाई झालीच पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर मी इथून उडी मारून आत्महत्या करेल, अशी भूमिका घेत त्याने जोरजोरात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली.

या घटनेमुळे सिग्नलवर असलेल्या बाईक स्वारांनी स्वतःच्या गाड्या बाजूला घेऊन संबंधित प्रकार नेमका काय आहे? तरुणाची मागणी काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी शेकडो दुचाकी एकाच जागेवर थांबलेल्या पाहायला मिळाल्या. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. लोकांची गर्दी होताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत या तरूणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीवर ठाम असलेला तरुण पोलिसांचे काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

दरम्यान, पोलिसांनी अनेक प्रयत्न करून महेंद्र देवकर या तरुणाची समजूत काढली आणि बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर या तरुणाला पुलाच्या खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. पण त्याआधीच पोलिसांनी चुकीची घटना घडू नये, यासाठी अग्निशमन पथकाला देखील घटनास्थळी बोलावून घेतले होते.

First Published on: May 30, 2023 9:41 PM
Exit mobile version