अखेर ‘त्या’ पत्रकारावरील गुन्हा रद्द; देवळाली कॅम्पमध्ये केले होते ‘स्टिंग’

अखेर ‘त्या’ पत्रकारावरील गुन्हा रद्द; देवळाली कॅम्पमध्ये केले होते ‘स्टिंग’

मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

लष्कराच्या नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईत अडकलेल्या पत्रकार पूनम अगरवाल आणि लष्करातील निवृत्त अधिकारी दीपचंद सिंग यांना आज, गुरुवारी मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला. ‘ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट’ अन्वये त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा हायकोर्टानं रद्द केला. कॅम्पमध्ये जवानाचा वरिष्ठांकडून छळ होत असल्याचं या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून दाखवण्यात आलं होतं.

लष्कर कॅम्पमधील पोलखोल पडली महागात 

लष्करात प्रचलित असलेल्या ‘सहायक’च्या पद्धतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठांना किरकोळ कामे सांगून त्यांची छळवणूक केली जाते, असे दाखवणारे वृत्त एका न्यूज वेबसाइटने फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रसिद्ध केले होते. पत्रकार पूनम अगरवाल यांनी कारगील युद्धात सहभागी झालेले लष्करातील निवृत्त अधिकारी दीपचंद सिंग यांच्या मदतीने नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. त्यात लान्स नायक रॉय मॅथ्यू यांची ओळख उघड न करता त्यांची मुलाखतही घेण्यात आली होती. मात्र, स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॅथ्यू यांनी ७ मार्च २०१७ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मॅथ्यू यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी पूनम आणि दीपचंद यांच्याविरोधात ‘ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट’ अन्वये गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज पूनम आणि दीपचंद यांनी हायकोर्टात केला होता.

First Published on: April 18, 2019 5:00 PM
Exit mobile version