Corona Vaccine: भारत बायोटेकने पुण्यातील २८ एकर जमीन मागितली – अजित पवार

Corona Vaccine: भारत बायोटेकने पुण्यातील २८ एकर जमीन मागितली – अजित पवार

दर आठवड्याला पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली जाते. या आठवड्यातील आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हैदराबाद स्थित लस निर्मित कंपनी भारत बायोटेकने पुण्यातील २८ एकर जमीन मागितली असल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ भारत बायोटेकला जागा देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे अजित पवार यावेळेस म्हणाले.

अजित पवार यांनी सांगितले की, ‘भारत बायोटेकने आपल्या जिल्ह्यातील २७ ते २८ एकर जमीन मागितली आहे. ती जमीन ताबडतोब देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. काल जाऊन दोघांनी पाहणी केली आहे. भारत बायोटेकची मशनरी आली आहे. कोव्हॅक्सिन लस पुण्यात तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला कदाचित तीन महिने लागतील. त्यामुळे आता राज्य सरकारने आणि प्रशासनाने त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे.’

पुढे अजित पवार म्हणाले की, ‘या लसीची निर्मिती सुरू झाल्यानंतर त्याचाही आपल्याला उपयोग होईल. मी आयुक्त सौरभ राव यांना त्यांच्याशी बोलायला सांगितले आहे. जेवढी लस तयार होईल त्यापैकी निम्मी लस केंद्राला दिली जाईल. पण जी काही उर्वरित लस असेल ती महाराष्ट्र सरकारला देण्याची चर्चा करण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्याचा फायदा राज्यातील नागरिकांना होईल. सध्या सीरम, भारत बायोटेक लसीचे उत्पादन वाढवत आहे. १० कोटीपर्यंत लस मिळेल, असे नियोजन सीरमने केले आहे. तर ७ ते ७.५० कोटीपर्यंत लस मिळेल, असे नियोजन भारत बायोटेकने केले आहे.’


हेही वाचा – ६ कोटींचं कंत्राट रद्द केलंय, आता विषय उगाळत बसू नका – अजित पवार


 

First Published on: May 14, 2021 2:42 PM
Exit mobile version