वाजपेयींच्या अस्थिकलश रथावर, औताडेंचा ‘सेल्फी सोहळा’

वाजपेयींच्या अस्थिकलश रथावर, औताडेंचा ‘सेल्फी सोहळा’

फोटो सौजन्य- इंडिया टुडे

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर तोफ डागणारे उपमहापौर विजय औतुडे, गुरुवारी एका वेगळ्याच कारणामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. गुरुवारी औतुडे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश रथावर सेल्फी सोहळा साजरा केला. वाजपेयींच्या बॅनरपुढे सेल्फी घेण्यात मग्न असतानाचा विजय औतुडे यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. एकीकडे अटलजींच्या निधनामुळे देशभरात तसंच भारतीय जनता पक्षात शोक मनवला जात असताना, दुसरीकडे हा औतुडेंचा हा सेल्फी सोहळा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान अटलजींच्या अस्थिकलश रथावर सेल्फी घेण्याचा औतुडेंचा हा ‘पोरखेळ’, भाजपचे वरिष्ठ नेते खपवून घेणार का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात गेल्या गुरुवारी वाजपेयींचा अस्थि कलश अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी आमदार सुजितसिंग ठाकूर, उपाध्यक्ष डॉ. भागवत, आमदार अतुल सावे, प्रदीप घुगे, एकनाथ जाधव यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. अत्यंदर्शनाची वेळ संपल्यानंतर वाजपेयींचा अस्थिकलश, सजवलेल्या ट्रकमधून सन्मानासहित जालन्याकडे रवाना करण्यात आला. उस्मानपुरा ते जालना असा अस्थिकलशाचा प्रवास सुरु असताना, उपमहापौर विजय औतुडे यांनी ट्रकवरच अस्थि कलशासोबत सेल्फी घ्यायला सुरुवात केली. दरम्यान स्थानिक नगरसेवक अनिल मकरिये हे देखील औतुडेंच्या सेल्फी घेण्याच्या कृतीचे समर्थन करताना दिसले. औतडेंच्या या सेल्फी सोहळ्यामुले स्थानिक रहिवाशी देखील अवाक झाल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: August 25, 2018 1:17 PM
Exit mobile version