शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १८ लाख ८९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १८ लाख ८९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

अजित पवार

राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळे सगळेच हतबल झाले असून, दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट असतानाच महाविकास आघडी सरकारने मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत, राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अशी केली शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा 

दरम्यान जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख जमा करण्यात आले असून, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सन २०१७ ते २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास, त्या शेतकऱ्यांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पिककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येईल. तसेच, ही रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.


हेही वाचा – लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचार्‍यांचा मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात


 

First Published on: April 1, 2020 12:10 PM
Exit mobile version