वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या का?; फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या का?; फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्र पोलीस दलात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नेमकं हे आदेश परत घेण्याचं कारण काय आहे हे देखील समजलं पाहिजे. काही प्रशासकीय चूक झाली आहे. मागच्यावेळेस जसं दहा आदेश पोलीस उपायुक्तांचे थांबवले. नंतरच्या घोटाळ्यामध्ये ते सीबीआयच्या निगराणीखाली आहेत. त्या काळामध्ये वसुलीचा तो भाग होता असं देखील लक्षात येत आहे. असा काही प्रकार आहे का? नेमका काय प्रकार आहे? असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

पोलखोल थांबणार नाहीत

भाजपच्या पोलखोल यात्रेच्या रथाची अज्ञातांनी तोडफोड केली. शिवसेनेने या रथाची तोडफोड केली असा आरोप भाजपने केला आहे. यावर फडणवीस यांनी बोलताना कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी जर त्यांना संरक्षण दिलं तर पोलिसांची देखील आम्ही पोलखोल करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारच्या मंत्र्यांमुळे अमरावतीत दंगली

अमरावती जिल्ह्यामध्ये इंग्रजांचं राज्य जसं चालायचं तसं तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. विशेषत: ज्या प्रकारे लांगुलचालन हे सरकारचे मंत्री त्या ठिकाणी करत आहेत, त्यातून परिस्थिती अधिकवाईट होत आहे. लांगुलचालनामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे राहत आहेत. आज जी काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे त्याचं एकमेव कारण पोलीस आणि सरकार यांची जी प्रतिक्रिया आहे, आणि विशेषत: ज्या प्रकारे हिंदू समाजाला लक्ष्य करणाचं काम अमरावती आणि अमरावती जिल्ह्यात होत आहे. याच्यामुळे तणाव वाढतोय. पोलिसांनी जात-धर्म न पाळता काम केलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

First Published on: April 21, 2022 12:00 PM
Exit mobile version