आम्ही वैचारिक विरोधक मानतो; उद्धव ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

आम्ही वैचारिक विरोधक मानतो; उद्धव ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

कोल्हापूरः आम्ही कधी कोणाला शत्रू मानले नाही. आम्ही केवळ वैचारिक विरोधक मानतो. ते एक नंबरचे शत्रू मानत असतील तर त्यांना मानू द्या, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक नंबरचे शत्रू आहेत, अशी टीका सामना दैनिकातून ठाकरे गटाने केली आहे. या टीकेली फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

फडणवीस हे कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली आणलं गेलं आहे, असा आरोप होत आहे, या प्रश्नावर उपमुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग आहे. त्यामुळेच आम्ही एका मंचावर होतो. शिवसेनेला योग्य त्या जागा दिल्या जातील. परिणामी कोणताही गैरसमज पसरवू नका. आमचा फॉर्मुला ठरला आहे. योग्य वेळी आम्ही आमचा फार्मुला जाहिर करु, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे एक नंबरचे शत्रू आहेत, अशी टीका सामना दैनिकांतून करण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही कधीच कोणाला शत्रू मानले नाही. आम्ही वैचारिक विरोधक मानतो. त्यांनी ठरवावं आता शत्रू मानावं की अजून काही.

सामना दैनिकाच्या अग्रलेखातून अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अमित शाह हे एक नंबरचे शत्रू आहेत, असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. सत्तेचा आज एवढा बेगुमान गैरवापर इतिहासात याआधी कधीच झाला नव्हता. आता गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन सांगतात, ”धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते!” हे भंपक विधान ते एक नंबरच्या धोकेबाजांच्या मांडीस मांडी लावून करीत आहेत. मोदींच्या नावाने मते मागितली, मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले, असे दिव्य विचार त्यांनी मांडले. असे बोलणारे स्वतःच्या ढोंगबाजीवरच शिक्कामोर्तब करीत आहेत, असं म्हणत शिंदे गटाचा समाचार घेण्यात आला. शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

First Published on: February 20, 2023 10:32 AM
Exit mobile version