‘भाजप मोठा भाऊ हे शिवसेनेच्या पचनी पडायला वेळ लागतोय’

राज्यात मोठा भाऊ कोण? शिवसेना की भाजप? यावरून सध्या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. पण, भाजपा मोठा भाऊ आहे हे शिवसेनेच्या पचनी पडायला वेळ लागतोय असं म्हणत शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळी काढली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच शिवसेनेसोबतची आमची २५ वर्षाची युती तुटली त्याला आम्ही जबाबदार नाहीत असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजप युती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवला. २०१४ साली आम्ही शिवसेनेला १४७ जागा देणार होतो. तर, आम्ही १२७ जागांवर निवडणूक लढवणयाची तयारी दर्शवली होती. शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र, शिवसेना १५१ जागांवर अडून बसली होती. जवळपास चार दिवस चर्चा केली. पण, त्याला यश आले नाही. जर त्यावेळी युती झाली असती तर शिवसेनेला १२०च्या आसपास आणि आम्हाला १०५  जागा जिंकत्या आल्या असत्या. पण, माझ्या नशिबी मुख्यमंत्रीपद होतं म्हणून शिवसेनेनं आम्ही दिलेला प्रस्ताव फेटाळला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

युती बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री

आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना – भाजप युती होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. तसेच मुलायम सिंह आणि मायावतीं सारखे विरोधक एकत्र येतात. मग, शिवसेना-भाजपा युती का होऊ शकत नाही ? असा सवाल देखील त्यांनी केला. दरम्यान, मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेसोबत विचार करून आम्ही निर्णय घेतो. काही मुद्यावर मतभेद होत असल्यास आम्ही ते संवादानं सोडवतो असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

First Published on: October 30, 2018 9:58 PM
Exit mobile version