कोविडचा भ्रष्टाचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे; फडणवीसांनी काढली सरकारची लक्तरं

कोविडचा भ्रष्टाचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे; फडणवीसांनी काढली सरकारची लक्तरं

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मार्च महिन्यात जेव्हा कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपविण्यात आले होते. तेव्हा महाराष्ट्रात केवळ २६ रुग्ण होते. आजच्या तारखेला ९ लाख २३ हजार ६४१ एवढे रुग्ण राज्यात वाढले असून त्यापैकी २ लाख ३६ हजार ९३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राने सुरुवातीपासून कोरोनाशी नाही तर आकडेवारीशी आपली लढाई केली. आकडे कसे लपविता येतील. याचाच प्रयत्न सरकारने केला. सरकारने जे कोविड सेंटर उभे केलेत. ते भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहेत. ते कुणाच्या फायद्यासाठी आहेत? कुणाच्या नातेवाईकांना कंत्राटे मिळाली आहेत, हे आम्ही बाहेर आणूच. मात्र सरकारने कोविड सेंटरमध्ये केलेला भ्रष्टाचार हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सरकारने बांधलेल्या जंबो कोविड सेंटरमधला मृत्यूदर ३७ टक्के आहे. तिथे गेलेला प्रत्येक तिसरा माणूस मरण पावत आहे. ही अवस्था अत्यंत गंभीर अशा स्वरुपाची आहे. नेस्को कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झालेला असून ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. खासगी रुग्णालयावर सरकारचा कुठलाही वचक राहिलेला नाही. औषधांचे बिल १० लाख दिले जाते. रोज रेमडेसिवीर इंजेक्शन दिले तरी एवढे बिल होणार नाही. जो दहा लाखांचे बिल देऊ शकतो, त्या रुग्णाला कुठेही बेड मिळतो. पण ज्याकडे पैसे नाहीत असा गरिब रुग्णाला कुठेही बेड मिळत नाही. डॅशबोर्डवर बेड फुल दिसतो. मात्र मागच्या दाराने पैशावाल्यांना बेड मिळतो, अशी टीका फडणवीस यांनी केली.

फडणवीस पुढे म्हणाले की, सरकारने नको त्या गोष्टीवर कोरोनाकाळात पैसे खर्च केले. केरळच्या डॉक्टर आणि नर्सेसना वेतन दिले नाही. म्हणून ते परत निघून गेले. सरकारने अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केले. पण डॉक्टर, नर्सेसना पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ फक्त ९ हजार रुग्णांना मिळाला आहे. सरकारची घोषणा आणि जीआरमध्ये फरक आहे. सर्व रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देऊ, असे सांगितले होते. मात्र जीआरनुसार फक्त क्रिटिकल रुग्णांना मदत मिळणार आहे. मग सेमी क्रिटिकल आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

कोविड काळात आम्ही सरकारशी संघर्ष केला नाही. पत्राच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या ठेवल्या. पण माझ्या एकाही पत्राचेही उत्तर मला मिळाले नाही. ज्याप्रकारे अधिवेशनाचे कामकाज सुरु आहे. त्यावरुन आपण कोरोना संदर्भात गंभीर नसल्याचे दिसत असल्याचे फडणवीस म्हणाले. पुरवणी मागणीवर चर्चा करण्याची सरकारची इच्छा नाही. विदर्भात पूर आलाय, कोकणात वादळ आलंय, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत, दूधाला भाव मिळत नाही. यावर चर्चा करायला नको का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “देशातील एकूण मृत्यूपैकी सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. जुलैच्या तुलनेत आता नवीन हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. आज महाराष्ट्रातील सर्व गावांपर्यंत कोरोना पोहोचत आहे. मी राज्यकर्त्यांना मनापासून विनंती करतो की सरकारने असे वागू नये”, अशी विनंती फडणवीस यांनी केली.

First Published on: September 8, 2020 1:53 PM
Exit mobile version