Devendra Fadnavis : पुन्हा आनंदाची बातमी, एफडीआयबाबत फडणवीसांनी दिली अपडेट

Devendra Fadnavis : पुन्हा आनंदाची बातमी, एफडीआयबाबत फडणवीसांनी दिली अपडेट

मुंबई : एकीकडे मोठमोठ्या प्रस्तावित प्रकल्पांसह महाराष्ट्रात सुरू असलेले प्रकल्प गुजरातमध्ये पळवून नेले जात असल्याची टीका विरोधक करत असतानाच, परकीय गुंतवणुकीबाबतची (FDI) आकडेवारी समोर आली आहे. सोशल मीडियावर ही आकडेवारी शेअर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘पुन्हा आनंदाची बातमी,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – CM Shinde : अमळनेर साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन तसेच टाटा एअरबस हे दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यावर विरोधकांनी यावरून रान उठविले होते. त्यानंतर गुजरात सरकारने जगभरातील उद्योजकांसाठी पुढील वर्षी 10 ते 12 जानेवारी दरम्यान 10व्या ‘ग्लोबल व्हायब्रंट गुजरात समिट’चे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने तेथील मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अलीकडेच मुंबईत येऊन राज्यातील उद्योजकांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी साद घातली. त्यासाठी त्यांनी बड्या उद्योजकांची भेटही घतेली होती.

अशाप्रकारे महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याची टीका महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून होत असतानाच, राज्यातील परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा अद्याप पहिलाच क्रमांक असल्याची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करून महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता. 2023-24च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली. तर, दुसर्‍या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली असून, 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करून महाराष्ट्राने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Fadnavis : मोदीजींच्या कानात हळूच सांगितले तरी चालेल…, काँग्रेसचा फडणवीसांना टोला

एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – राम मंदिर झाल्याचा आनंद, पण…; Sharad Pawar यांनी बाबरीच्या मुद्द्यावरून भाजपाला केले लक्ष्य

First Published on: December 27, 2023 9:59 PM
Exit mobile version