कायदा पाळतो याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही, शिवसैनिकांच्या राड्यावर फडणवीसांचा इशारा

कायदा पाळतो याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही, शिवसैनिकांच्या राड्यावर फडणवीसांचा इशारा

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांना पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. सोमय्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला आहे. सोमय्यांवरील हल्ल्याचा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध केला आहे. आम्ही कायदा पाळतो पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी माजी खासदार किरीट सोमय्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोमय्यांना महापालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत कारवाई करण्याचे निवेदन देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याबाबत सोमय्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार होते. परंतु शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत जाताना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली आहे. पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी किरीट सोमय्या पायऱ्यांवर कोसळले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?, आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे?, आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय आहे प्रकरण?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्या प्रकरणी सोमय्या तक्रार करणार होते. परंतु शिवसैनिकांनी सोमय्यांचा विरोध केला. किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत जात असताना त्यांना शिवसैनिकांनी अडवले. शिवसैनिकांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिस्थिती पाहून किरीट सोमय्या पुन्हा गाडीच्या दिशेने जात होते. यावेळी धक्काबुक्कीमध्ये सोमय्या पायऱ्यांवर कोसळले. दरम्यान किरीट सोमय्यांवरील हल्ल्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Breaking : पुण्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले, किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

First Published on: February 5, 2022 7:25 PM
Exit mobile version