जुलैत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार – देवेंद्र फडणवीस

जुलैत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार – देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होईल. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीला मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा मुहूर्त सांगितला. फडणवीस शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी ३० जून २०२२ ला अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

त्यानंतर तब्बल ४० दिवसांनी ९ ऑगस्ट २०२२ रोजी शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी ९ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तेव्हापासून जवळपास ११ महिने मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अधूनमधून सुरू असते. मधल्या काळात शिवसेनेची सर्व सूत्रे शिंदे गटाच्या हाती आली आणि सत्ता संघर्षाच्या निकालानंतरही शिंदे-फडणवीस सरकार टिकले. तरी मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या शिवसेना-भाजपमधील नेत्यांची प्रतीक्षा कायम आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यासंदर्भात प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात आम्हाला भेट घ्यावी लागते. त्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळेला त्यासंदर्भात बैठकादेखील असतात. आम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबद्दलचा निर्णय घेतील, पण मला वाटते जुलै महिन्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार करू. यावेळी केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार आधी की राज्याचा, असा प्रश्न विचारल्यावर केंद्राच्या आणि राज्याच्या विस्ताराचा काही आपसात संबंध नाही. केंद्राचा विस्तार कधी होणार हे आम्हाला माहीत नाही. आम्ही राज्याच्या विस्तारात जास्त लक्ष देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सत्तार, भुमरे, राठोडांचे मंत्रीपद धोक्यात?
केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळातून काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळेल. त्यात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर राजकीय वर्तुळात होती. त्यावर प्रश्न विचारला असता ज्यांना कोणतीही बातमी मिळाली नाही, तेच लोक अशा बातम्या पेरतात. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

केंद्रात शिवसेनेला २ मंत्रीपदे
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या विस्तारात भाजपच्या महाराष्ट्रातील २ अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागी शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा आहे. या पदांवर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय केंद्राने मुख्यमंत्री शिंदेंवर सोपवला असल्याचे समजते.

First Published on: July 1, 2023 4:23 AM
Exit mobile version