‘त्या’ शिवसैनिकाच्या कुटुंबाला मिळालं हक्काचं घर; शिंदेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर नाराजी

‘त्या’ शिवसैनिकाच्या कुटुंबाला मिळालं हक्काचं घर; शिंदेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर नाराजी

संग्रहित छायाचित्र

 

बीडः उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड ते तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढणाऱ्या बीड येथील शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांसाठी टोलेजंग घर बांधून देण्यात आलं आहे. घरामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. या पदयात्रेत रुईकर यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेने घेतली होती. त्यानुसार रुईकर कुटुंबियांना घर बांधून देण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक होत आहे.

या घराचा ताबा रुईकर कुटुंबियांना देण्यात आला. त्यावेळी रुईकर यांच्या पत्नीने उद्धव ठाकरे यांच्या विषयी खंत बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांच्यासाठी पतीची जीव गेला. मात्र ठाकरे कुटुंबियांकडून साधी विचारपूस करायला कोणी आलं नाही. कुटुंबाची जबाबदारी घेतली. पण दीड वर्षांत साधा फोन केला नाही. आदित्य ठाकरेंचा दोन वेळा बीड जिल्ह्यात दौरा झाला. तेही भेटायला आले नाहीत. त्यामुळे पतीचं निधन वाया गेल्यासारखं वाटतं, असे रुईकर यांच्या पत्नीने बोलून दाखवलं.

सुमंत रुईकर यांनी २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड ते तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. महापालिका. नगरपालिका, नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावा, अस नवस रुईकर बोलले होते. मात्र ही पदयात्रा कर्नाटक जवळ गेली आणि रुईकर यांचा मृत्यू झाला. रुईकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नी, मुलगी, मुलगा आणि वयोवृद्ध वडील हे रुईकरांवर अवलंबून होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबियांना आधार दिला. रुईकर कुटुंबियांची जबाबदारी ठाणे शिवसेनेने घेतली होती. त्यानुसार बीड जिल्ह्यातील बोडेश्वर येथे रुईकर कुटुंबियांना घर बांधून देण्यात आलं.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. रुईकर कुटुंबियांना हक्काचं घर मिळाल्याने एकनाथ शिंदे यांचे कौतुक होत आहे.

 

 

First Published on: April 24, 2023 7:24 PM
Exit mobile version