Corona: या मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकांनी जपले सामाजिक भान; आईच्या उत्तरकार्याचे पैसे केले दान

Corona: या मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकांनी जपले सामाजिक भान; आईच्या उत्तरकार्याचे पैसे केले दान

एकीकडे स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही दुसरीकडे आजूबाजूला सुरू असलेल्या परिस्थितीचे भान ठेवून वागणारे खुप कमी असतात. असेच सामाजिक भान राखणारे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी हे आहेत. प्रशांत जोशी यांनी आपल्या आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे.

नेमकं काय घडले

धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या मातोश्री इंदूबाई भास्करराव जोशी यांचे गेल्या आठवड्यात २ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रशांत जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तरकार्याचा खर्च टाळून २५ हजार रुपये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. प्रशांत जोशी यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला सर्व क्षेत्रातील लोकांकडून प्रतिसादही मिळत आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रशांत जोशी हे धनंजय मुंडे यांच्यासोबत सेवेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या कार्यासाठी प्रशांत जोशी यांनी आईच्या निधनानंतर दोनच दिवसात कामावर रुजू होऊन घरातूनच पूर्ण वेळ काम सुरू ठेवले. दरम्यान, आईच्या उत्तरकार्याचा विधी घरच्या घरी करत त्यांचा खर्च टाळून तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला.

हेही वाचा –

Coronavirus: नायर रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेची आत्महत्या

First Published on: April 15, 2020 2:27 PM
Exit mobile version