धीर सोडू नका; धनंजय मुंडेचा त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना आधार

धीर सोडू नका; धनंजय मुंडेचा त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना आधार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

तुमच्या कुटुंबियांवरचे दुःख मोठे आहे. मात्र धीर सोडू नका, आमच्या भगिणींवर अत्याचार करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा भाऊ स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हिंजवडी येथील त्या पीडित मुलींच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच कुटुंबास एक लाख रूपयांची रोख स्वरूपात मदतही केली. पुण्यातील हिंजवडी परिसरात राहणार्‍या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे समाजात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिंजवडी येथे त्या पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्या मुलींच्या शिक्षणासाठी एक लाख रूपयांची रोख स्वरूपात मदत केली तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना दुरध्वनीवरून या घटनेतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा, अशी सुचना केली.

“ही घटना अतिशय संतापजनक असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. शाळेत जाणार्‍या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही. या प्रकरणी आपण आरोपींवर कठोरात-कठोर कारवाई होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही”, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली. आगामी अधिवेशनातही कायदा आणि सुव्यवस्थ तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अडचणी, त्यांच्या समस्या, ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा, ऊसतोड कामगार महामंडळ आदी प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

कुटुंबिय गहिवरले

धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सदर कुटुंबिय गहिवरून गेले होते. या संकटसमयी आपण भाऊ म्हणून धीर देण्यासाठी आला आहात. आता आम्हाला तुमचाच आधार आहे. या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका, अशी भावनिक साद त्यांनी मुंडेना घातली.

First Published on: September 28, 2018 3:58 PM
Exit mobile version