ढोलपथकावर काळाचा घाला; अपघातात ५ जण ठार

ढोलपथकावर काळाचा घाला; अपघातात ५ जण ठार

(फोटो प्रातिनिधिक आहे)

राज्यभरात गणरायाच्या विसर्जनाची धामधूम सुरु असतानाच गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी जात असलेल्या ढोलपथकाला गालबोट लागले आहे. वाशिम येथे राहणारे ढोलपथक जीपने सिंदखेडराजा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी निघाले होते. हे ढोलपथक बुलढाण्यातील लोणारजवळ पोहोचले असता या ढोलपथकाच्या गाडीला अपघात झाला. हे ढोलपथक शनिवारी रात्री जीपमधून सिंदखेडराजा येथील गणपती मिरवणुकीला निघाले असताना जीप आणि लक्झरी यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ढोलपथकातील पाच जण जागीच ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमके काय घडले?

वाशिम येथे राहणाऱ्या ढोलपथकाला गणपती विसर्जन मिरवणुकीकरता ढोलपथक वाजवण्यासासाठी ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार हे ढोलपथक भरजहागीर येथून बोलेरो जीपमधून शनिवारी रात्री सिंदखेडराजा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीकरता निघाले होते. या ढोलपथकामध्ये अंदाजे १३ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाण्यातील लोणारजवळ ढोलपथकाची जीप पोहोचली असता जीप आणि लक्झरीमध्ये धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल

नागपूर – मुंबई महामार्गावर हा अपघात झाला असून या अपघातात अरुण कांबळे (२२), राजू कांबळे (२५), ज्ञानेश्वर डोंगरे (२०) यांच्यासह आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर आठ जखमींना बीबी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढोलपथकातील सर्व सदस्य वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर या ठिकाणी राहणारे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

First Published on: September 23, 2018 2:11 PM
Exit mobile version