‘मधुमेही, हृदयरोगी, कर्करोगी, मुलं आणि गर्भवती महिलांनी रेल्वेने प्रवास करु नये’

‘मधुमेही, हृदयरोगी, कर्करोगी, मुलं आणि गर्भवती महिलांनी रेल्वेने प्रवास करु नये’

परराज्यात जाणारे श्रमिक

देशभरात विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपापल्या राज्यात सोडण्यासाठी १ मे पासून श्रमिक रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र या प्रवासात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता रेल्वेप्रशासनाने खबरादरीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. “यापुढे मोर्बिडीटीज (उदाहरणार्थ – उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमतरता असलेले), गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा.”, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

श्रमिक आपापल्या घरी परत जावेत या उद्देशाने भारतीय रेल्वे दररोज श्रमिक विशेष गाड्या देशभरात चालवत आहे. या सेवेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्यांची वैद्यकीय/शारीरिक स्थिती आधीपासूनच बिघडलेली आहे, त्यांना कोविड -१९ साथीच्या आजारात अजून धोका वाढण्याची शक्यता आहे. आधीपासूनच विविध आजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासा दरम्यान घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने १७ मे रोजी एक शासन आदेश (क्रमांक. ४०-३/ २०२०-डी.एम.- I (ए) काढला होता. या आदेशान्वये मोर्बिडीटीज असलेल्या प्रवाशांनी प्रवास टाळावा असे सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, “देशातील काही नागरिक यावेळी रेल्वे प्रवास करू इच्छितात आणि त्यांना रेल्वे सेवा मिळावी यासाठी भारतीय रेल्वे परिवार २४×७ सतत कार्यरत आहे. प्रवाशी सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी प्रवाशांचे सहकार्य अपेक्षित आहे.” तसेच कुठल्याही कठीण प्रसंगी, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे परिवाराशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक – १३९ आणि १३८ यावर संपर्क साधावा, असेही आवाहन शिवाजी सुतार यांनी केले आहे.

हे वाचा – रेल्वे स्टेशनवर मृत पडलेल्या आईला उठवण्यासाछी चिमुकल्याची धडपड

First Published on: May 29, 2020 12:07 PM
Exit mobile version