डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणणार – मुख्यमंत्री

डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणणार – मुख्यमंत्री

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. एखादा रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्यावर तिथल्या वातावरणाने त्याला प्रसन्न वाटले पाहिजे, अशाप्रकारे आरोग्य संस्थांचा कायापालट करणार असून डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त ॲपेक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, ॲपेक्स फाऊंडेशनचे डॉ. श्रीरंग बिच्चू आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना रुग्णांना डायलिसीसची सुविधा देण्यासाठी ॲपेक्स फाऊंडेशनच्या मदतीने मोठे सहकार्य मिळाले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांची सेवा करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे देवदूत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. जगण्याच्या शर्यतीत माणसाला स्वत:च्या आरोग्याचा विसर पडतो. माणूस जगण्यासाठी मर मर करतो त्यामुळे जीवनशैली आणि दिनश्चर्या बदलतो यातून निसर्गचक्र बदलल्यामुळे मुत्रपिंड, हृदय विकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दैनंदिन आयुष्य जगताना आरोग्य जपा असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर असणारी डायलिसीसची सुविधा आता तालुकास्तरावर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात परवडणाऱ्या किंमतीत डायलिसीसची सुविधा उपलब्ध होण्यासाठी पेरिटोनिअल डायलिसीसच्या वापराबाबत ॲपेक्स फाऊंडेशनने पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
कोरोना काळात डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञांनी कोरोना रुग्णांना डायलिसीसची सेवा दिली यासर्वांनी केलेले काम लक्षणीय असून त्याला सलाम करतो अशी भावना टोपे यांनी व्यक्त केली. राज्याच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपणाचा समावेश असून त्यासाठीची रक्कम वाढविण्यााबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी मनोगत व्यक्त केले.


हेही वाचा – नागपुरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर

 

First Published on: March 11, 2021 10:39 PM
Exit mobile version