थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशाला मुदतवाढ

थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशाला मुदतवाढ

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणार्‍या थेट द्वित्तीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना आता २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांमधील थेट द्वित्तीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. परंतु कोरोनाचा प्रभाव आणि महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २४ नोव्हेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीमध्ये तक्रार असल्यास विद्यार्थ्यांना २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत तक्रार नोंदविता येईल. तसेच अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला जाहीर होईल.

First Published on: November 18, 2020 6:51 PM
Exit mobile version