राड्याचे कारण सत्तास्थापनेचा दावा; कार्यकर्त्याने घेतला मित्राच्या कानाचा चावा

राड्याचे कारण सत्तास्थापनेचा दावा; कार्यकर्त्याने घेतला मित्राच्या कानाचा चावा

राज्यात प्रत्येक तासाला सत्ता स्थापनेच्या हालचाली बदलत आहेत. एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते आता मांडीला-मांडी लावून ही समीकरणे जुळवून आणत आहेल. मात्र, असे असताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते किती एकनिष्ठ आहेत, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. पक्षाच्या विरोधात का बोलतो? म्हणून एकाने थेट आपल्या मित्राच्या कानालाच चावा घेतला आणि अर्ध्या कानाचा तुकडाच पाडला.

नेमके काय घडले?

निलंगा तालुक्यातील इमानवाडी येथे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रत्नाजी नाईकवाडे, शैलेश नाईकवाडे आणि संदीप शिंदे हे मित्र गप्पा मारत बसले होते. पक्षातील हेवेदावे एवढ्या टोकाला पोहचले की रत्नाजी नाईकवाडे याने तू भाजप पक्षाच्या विरोधात का बोलतो? म्हणत संदीप याच्या कानाला चावा घेतला. यामध्ये संदीपचा अर्धा कानच तुटून निघाला. मग काय सुरू झालेली चर्चा थेट हाणामारीपर्यंत पोहचली. किराणा दुकानालगत असलेल्या जमावाने हे भांडण सोडवले. अखेर याप्रकरणी संदीपचा भाऊ सागरने निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया ते गाव कट्टा

गेल्या २० दिवसांपासून सत्ता स्थापनेची वेगवेगळी समीकरणे समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विविध अंगाने चर्चा होत आहे. अनेक वेळा नेटकरी हुमरीतुमरीवर येतात. आता नव्याने ’महाशिवआघाडी’ची सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यामध्येच रत्नाकर हा भाजपचा कार्यकर्ता निघाला आणि पक्षाविरोधात बोलत असलेल्या सागर या मित्राचाच त्याने चावा घेऊन कान तोडला. त्याच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हणमंत पडीले करत आहेत.


हेही वाचा – एकतर्फी प्रेमातून तरुणाची ब्लेडने नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न


 

First Published on: November 14, 2019 10:43 PM
Exit mobile version