कोरोनामुक्तीनंतर लगेचच औषधोपचार बंद करू नका

कोरोनामुक्तीनंतर लगेचच औषधोपचार बंद करू नका
कोरोना विषाणू हा श्वसनप्रणालीवर हल्ला करणारा असल्याने घसा आणि नाकातील स्त्रावाच्या चाचणीमधून त्याचे अस्तित्त्व लगेचच स्पष्ट होते. अंगदुखी, सर्दी, ताप, घसा खवखवणे, अचानक उद्भवणारी तीव्र स्वरुपाची डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा येणे, दम लागणे, अशक्तपणा ही कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येतात. सौम्य, मध्यम आणि गंभीर यापैकी संसर्ग नेमक्या कोणत्या स्तरावर आहे, त्यानुसार उपचारांची दिशा ठरत असते. सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला दिला जातो.
या आजारात शरीरांतर्गत संसर्ग वाढत असताना, अनेकदा बाह्य स्वरुपात लगेचच त्याची लक्षणे दिसत नाहीत. कोरोना विषाणूंची संख्या ज्या गतीने वाढते त्यानुसार संसर्गही वाढत असतो. त्यामुळे वेळीच रोगनिदान झाल्यास तातडीने औषधोपचार सुरू करत संसर्गावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. सर्वसाधारणपणे रुग्णांना ताप आणि संसर्ग नियंत्रणासाठी औषधोपचार सुरू केले जातात. अर्थात, आजही आपल्याकडे प्रभावी ठरतील अशी ओपीडी बेसिसवर दिली जाणारी अँटी व्हायरल औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सौम्य प्रकारच्या संसर्गावर लाक्षणिक उपचार, पूरक आहार, स्वतः देखरेख ठेवणे यावर भर दिला जातो. जे रुग्ण सौम्य संसर्गाकडून मध्यम अथवा गंभीर आजारात जातात त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरू करणे गरजेचे असते. अशा रुग्णांमध्ये मल्टीविटॅमिन, रक्त पातळ करण्यासाठीच्या गोळ्या आणि प्रसंगी स्ट्रेरॉईड्स दिले जातात. सध्याच्या परिस्थितीत ८० टक्के रुग्ण हे या औषधांनी बरे झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर बनते त्यांना ऑक्सिजनसाठी व्हेंटिलेटर, अधिक क्षमतेच्या गोळ्या, प्रसंगी रक्त पातळ होण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी इंजेक्शन्स द्यावे लागतात.

या व्यक्तींना सर्वाधिक धोका

मधुमेही, रक्तदाबाचा त्रास असलेले, अपघात वा अन्य कारणांमुळे शस्त्रक्रिया झालेले, दीर्घकाळापासून औषधोपचार सुरू असलेले, ज्येष्ठ नागरिक, प्रतिकारशक्ती क्षीण झालेले अशा व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यास अधिक जोखीम निर्माण होऊ शकते. याउलट कमी वय, सुदृढ व्यक्तींमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती ही तुलनेने अधिक असल्याने त्यांच्यात कमी जोखीम असते.

दुष्परिणाम टाळण्यासाठी हे करा

बहुतांश रुग्ण आठवडाभराच्या औषधोपचारानंतर बरे वाटताच पुढील औषधोपचार बंद करतात. त्यांचा हा निर्णय अनेकदा जीवावर बेतू शकतो. तर काही रुग्ण लक्षणे दिसल्यानंतरही भीतीने किंवा अतिआत्मविश्वासामुळे डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात, हा उशीर जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे दिसतात तातडीने चाचणी करुन फॅमिली फिजिशियन किंवा एमडी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पहिल्या ७ दिवसांनंतर संसर्गावर शरीराकडून नियंत्रण मिळवले जाते, मात्र विषाणूंचे अस्तित्त्व नष्ट झालेले नसते. कोरोना रुग्णांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होऊन ब्रेम हॅमरेज, हार्ट अटॅकसारखे प्रकार दिसून आले आहेत. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील १५ दिवस काही औषधे सुरू ठेवावी लागतात. त्यामुळे दुष्परिणाम होत नाही किंवा संसर्ग उलटून येण्याची शक्यता राहत नाही.

म्हणून रेमडेसिवीर, टोसिलिझ्युमॅब प्रभावी

कोरोनाच्या विषाणुंशी लढा देताना शरीराची प्रतिकारशक्ती उच्चतम पातळीवर पोहोचलेली असते, शरीरांतर्गत संसर्ग वाढून श्वसनप्रणालीची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असते, पुढील टप्प्यात शरीरांतर्गत अवयवांवर सूज यायला सुरूवात होते आणि हीच स्थिती रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. रुग्ण अशा गंभीर अवस्थेत असताना अवयवांना सूज येण्यास कारणीभूत घटकांना (सायटोकाइन्स) रोखण्यासाठी टोसिलिझ्युमॅब इंजेक्शन परिणामकारक ठरत असते. रुग्णाला पहिल्या टप्प्यात दिलेल्या औषधांनंतरही संसर्ग कमी न झाल्यास रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. त्यानंतरही फुफ्फुसांची क्षमता सुधारली नाही आणि रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचला तर अशावेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर टोसिलिझ्युमॅब इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतात.

चव आणि गंध हे विशेष लक्षण

सर्वसाधारणपणे सौम्य आणि मध्यम संसर्ग असलेल्या रग्णांमध्ये पहिल्या तीन दिवसांतच चव आणि गंध जाणे हे लक्षण आढळते. मात्र, गंभीर रुग्णांमध्ये चव-गंध जात नाही, असे दिसून आले आहे. अनेकांना ताप येत नाही, मात्र चव व गंध जाते. अशा रुग्णांना हमखास कोरोना संसर्ग झालेला दिसून येतो.

कोरोनाचे आव्हान कठीण आहे, त्यामुळे त्याकडे आतातरी गांभिर्याने बघायला पाहिजे. सध्याच्या वातावरणात लोकांमध्ये योग्य माहिती जाणे अपेक्षित असताना, संभ्रम निर्माण होईल असे मेसेज व्हायरल होत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे. ज्या कोरोनाबाधितांचा ताप तीन दिवसांनंतरही कमी होत नसेल त्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. – डॉ. दिनेश वाघ, एम.डी., अशोका हॉस्पिटल

First Published on: April 12, 2021 9:14 AM
Exit mobile version