मेटेंच्या मृत्यूबाबत डॉक्टर पत्नीला संशय,म्हणाल्या मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही

मेटेंच्या मृत्यूबाबत डॉक्टर पत्नीला संशय,म्हणाल्या मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या कारला रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते बीडहून मुंबईकडे जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा अोलांडण्याआधी हा अपघात झाला. या सर्व घडामोडीनंतर विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केली आहे.

पण दोघांनीही कॉल उचलला नाही –

अपघाताची घटना घडल्यानंतर नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि वैद्यकीय टर्मीनोलॉजीच्या आधारे त्यांनी विनायक मेटेंच्या निधनाबाबत संशय व्यक्त केला आहे. ज्योती मेटे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा मी अक्षरश: धावत सुटले. मी विश्वास नांगरे पाटलांना फोन केला, माझा भाऊदेखील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहे, मी त्यालाही फोन केला. पण दोघांनीही कॉल उचलला नाही.

शेवटी मी वाहतूक पोलिसांना फोन केला. कारण चालक मला सांगत नव्हता की तो नेमका कुठे आहे? त्याला नेमके ठिकाण सांगता येत नसेल, तर तू व्हॉट्सअॅपवर लोकेशन पाठव… असे मी त्याला सांगत होते. पण त्याने तसे केले नाही. शेवटी मला वाहतूक पोलिसांकडून कळाले की साहेबांना एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केले आहे. मी रुग्णालयात पोहोचेपर्यंत तेही तिथे पोहचले होते.

मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही –

मी स्वत: डॉक्टर आहे. त्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आले की काहीतरी वाईट घडले आहे. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होते.

त्यानंतर माल तिथे थांबण्याची परवानगी दिली –

रुग्णालयात गेल्यानंतर  मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले. त्याठिकाणी डॉक्टरही होते, त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले. पण मी विनायक मेटेंची बायको आणि डॉक्टर असल्याचे त्यांना सांगितले  त्यानंतर त्यांनी माल तिथे थांबण्याची परवानगी दिली. मी साहेबांच्या  हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण ती हाताला लागली नाही. ईसीजीमध्ये ही कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या.

मला फोन येण्याअगोदर अपघाताची घटना घडून खूप वेळ झाला होता –

त्यानंतर मी भावाला सांगितले की, हे थोड्या वेळापूर्वी घडलेले नाही. मला फोन आल्यानंतर मी जवळपास पाऊण तासात याठिकाणी पोहोचले. पण ही पाऊण तासांपूर्वी घडलेली घटना नव्हती, ही घटना घडून किमाण दोन तास उलटले होते, म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवले जात होते. कदाचित ते लपवतही नसतील, मीच भयाकुल असेल, नेमके काय असेल? हे मला माहीत नाही. पण मला फोन येण्याअगोदर अपघाताची घटना घडून खूप वेळ झाला होता. या सर्व बाबी आता शवविच्छेदन अहवालातून समोर येतील, मृत्यूची नेमकी वेळी ही समजेल, असेही ज्योती मेटे म्हणाल्या.

First Published on: August 15, 2022 3:30 PM
Exit mobile version