डोंबिवली-कल्याण-टिटवाळा रिंग रोड अहमदनगर महामार्गाला जोडणार, वेळखाऊ प्रवास जलद गतीने होणार

डोंबिवली-कल्याण-टिटवाळा रिंग रोड अहमदनगर महामार्गाला जोडणार, वेळखाऊ प्रवास जलद गतीने होणार

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली-टिटवाळा परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले.

महत्त्वाकांक्षी रिंगरोडच्या टप्पा ३ ची निविदा १० ऑक्टोबर रोजी एमएमआरडीए जाहीर करणार आहे. यात ८६ टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात यश आले असून या कामामुळे या रिंगरोड प्रकल्पाला गती मिळेल. याच रिंग रोड प्रकल्पातील टप्पा ४ ते ७ मधील अडथळे दूर करत त्या कामाला गती दिली जाईल, या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण करण्यासाठी बाधितांना तात्काळ बीएसयूपी घरांचे वाटप केले जाईल, यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर येईल.

रिंग रोड प्रकल्पातील टप्पा १, २ आणि ८ ची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून कामाला गती दिली जाईल. रिंग रोड प्रकल्पात टप्पा क्रमांक सातनंतर टिटवाळ्याच्या रुंदे येथील रस्ता पुढे टप्पा ८ मध्ये थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाईल, त्यामुळे प्रस्तावित रिंग रोड खऱ्या अर्थाने परिपूर्ण होणार आहे.

कल्याण – तळोजा मेट्रो मार्ग १२ ला गती देण्याचा निर्णय झाला असून यात सल्लागाराची नेमणूक झाली आहे. तसंच, लवकरच निविदा जाहीर करून कामाला सुरुवात करण्यात येईल. शहाड येथील अरुंद पुलाच्या रुंदीकरणावर शिक्कामोर्तब झाले असून हा पूल १० मीटरचा असून त्याला ३० मीटर करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

विठ्ठलवाडी ते शहाड या उन्नत पुलाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वेळखाऊ प्रवास जलद होईल. डोंबिवली – मानकोली पुलाचे काम पूर्ण करून हा मार्ग एप्रिल २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे डोंबिवली – ठाणे प्रवास १५ मिनिटांवर होणार आहे.

या बैठकीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, उल्हासनगरचे माजी नगरसेवक अरुण आशान, कलवंतसिंह सहोता, अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष अब्दूलभाई शेख आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: October 3, 2022 9:24 PM
Exit mobile version