Prakash Ambedkar on Barsu : कोकणाची वाट लावू नका, प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

Prakash Ambedkar on Barsu : कोकणाची वाट लावू नका, प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

मुंबई – बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. स्थानिकांनीही या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. रत्नागिरी प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यात यामुळे संघर्ष पेटला आहे. बारसू येथील नागरिकांनी तीन दिवसांसाठी आंदोनल स्थगित करुन चर्चेची तयारी दाखवली आहे. (Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar’s oppose to refinery at Barsu)

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोकणाची वाट लावू नका, असे आवाहन केले आहे. त्यासोबतच एन्रॉनला घालवण्यात आमची महत्त्वाची भूमिका होती, याचीही आठवण मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकरांनी रविवारी ट्विट करुन बारसू रिफायनरीला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. या ट्विटमध्ये अॅड. आंबेडकरांनी कोकणाची वाट लावू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केले आहे.
कोकणात ९५% शुद्ध ऑक्सिजन आहे. इथलं वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राणी इथे जन्माला येतात. त्यामुळे ही शुद्धता टिकली पाहिजे. असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

राजकीय इच्छा शक्ती असेल तर कोकणाचा कॅलिफोर्निया…
कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न देखील या निसर्गसंपन्नतेतून सोडवता येऊ शकतो. कोकणाचा कॅलिफोर्निया होऊ शकतो, त्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. अॅड. आंबेडकार ट्विटमध्ये पुढे म्हणाले, मी सर्वांना आठवण करुन देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करु शकतो. ते खोटं नव्हतं. परंतू जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला, त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं, अशीही आठवण अॅड. आंबेडकरांनी सांगितली.

तेलंगणाप्रमाणे कोकणातील माणसाचे उत्पन्न वाढू शकते..
अॅड. आंबेडकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आवाहन केले की, ‘प्रदुषणकाही उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्यांच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते.’

प्रकाश आंबेडकर यांनी बारसू प्रकरणावर प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी कोकणातील रिफायनरीला विरोध दर्शवला आहे, आणि एन्रॉनला आम्ही घालवले होते, याचीही आठवण सांगून एक प्रकारे राज्य सरकारला इशाराही दिला आहे.

First Published on: April 30, 2023 3:52 PM
Exit mobile version