गर्दी नको, लॉकडाऊनमध्‍ये रेल्‍वे बंदच

गर्दी नको, लॉकडाऊनमध्‍ये रेल्‍वे बंदच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात लॉकडाऊनमुळे करोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाला असला, तरी राज्याचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. त्यामुळे ३ मे नंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याविषयी सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे. पण कुठेही गर्दी करू नका. लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंदच आहे. परप्रांतिय मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबत मी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सकाळी होणार्‍या कॉन्फरन्समध्ये बोलणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते रविवारी दुपारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत होते.

राज्य पोलीस दलातील करोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांविषयीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. सध्या करोनाविरोधातील या लढ्यात आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांसह पोलीस दल तणावाखाली काम करत आहे. स्वतःच्या घराचा, आयुष्याचा विचार न करता ही माणसं रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. त्यातच मुंबईत दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मी महाराष्ट्राच्यावतीने आणि सरकारच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो.

मुख्यमंत्र्यांनी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलबद्दलही शोक व्यक्त केला. पोलीस कर्मचारी आपले घरदार सोडून या लढाईत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पोलिसांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या वर्दीतल्या माणसाला समजून घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. सध्याचा काळ बाहेर पडून गर्दी करण्यासारखा नाही, त्यामुळे रमजानच्या काळात सर्व मुस्लीम बांधवानी घरात राहून प्रार्थना करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आधी डाळ तर येऊ द्या, मग बघू…
राज्यात करोनाच्या विषाणूमुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, करोनासंदर्भात निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरल्याची तसेच रेशनच्या धान्य वाटपावरून सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडून होणार्‍या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुणाचे नाव न घेता समाचार घेतला. केंद्र सरकारकडून आधी डाळ तर येऊ दे, मग बघू, असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी लॉकडाउनमुळे गुणाकारात वाढणार्‍या या संकटावर मात करण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत. आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा कोणावरही पटकन संशय व्यक्त करण्याआधी त्यांच्या परिस्थितीचा विचार करा. सध्या हे लोक खूपच तणावाखाली काम करीत आहेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सध्या केंद्रातील पथक राज्यातील करोनाविषयक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.सध्या एप्रिल महिन्याअखेर, मे महिन्यापर्यंत किती रुग्ण होतील, याविषयी आकडे फिरत आहेत. देशात, महाराष्ट्र, मुंबईत किती रुग्ण होतील, याचे आकडे पसरवले जात आहे. ‘मुंबईत काय चाललं आहे? चाचण्या कमी केल्यात का? लपवाछपवी सुरू आहे का?’ असे बोलले जात आहे. काहीही लपवलेेले नाही. अजिबात नाही. लपवण्यासारखे काहीच नाही. केंद्राचे पथक पाच सहा दिवसांपासून आपल्याकडे मुक्काम ठोकून आहे. मुंबई, पुण्यात आहे. हे पथक आल्यानंतर काहीजणांनी मला सांगितले. ‘बघा, केंद्राचे पथक आलेले आहे. दाल में कुछ काला हो सकता है?’ मी त्यांना सांगितले की, आम्ही त्यांच्याकडूनच डाळ मागतोय. कारण अजूनही अन्न सुरक्षा योजनेतंर्गत धान्य वाटायचे आहे. त्यात फक्त तांदूळ आहे. गहू आणि डाळ हवी आहे. दाल में काला बाद में, पहले दाल तो आने दो. डाळ आल्यानंतर त्याच्यामध्ये काळंबेरं आहे की नाही, ते नंतर बघू, पण आधी डाळ आली पाहिजे, गहू आला पाहिजे, असे म्हणत ठाकरे यांनी सरकारच्या कामावर संशय घेणार्‍यांना उत्तर दिले.

नितीन गडकरींचे मनापासून आभार
महाराष्ट्रालाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार करोनाच्या परिस्थितीचा सामना करत आहे. यावेळी विविध मुद्यांवर प्रकाश टाकत असताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले.काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही तर संकटाशी लढण्याची आहे. यावेळी गडकरी यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या होत्या. गडकरींचे आभार मानताना ठाकरे म्हणाले, मला गडकरींचे मनापासून आभार मानायचे आहेत. सध्याच्या काळात जी गोष्ट महत्वाची आहे, तीच गोष्ट त्यांनी सांगितली आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, आणि ते करण्यात मला रसही नाही. सरकारे येतील-जातील. आज आम्ही सत्तापक्षात आहोत, उद्या कोणीतरी दुसरे असेल. पण सध्या आपापसातले मतभेद विसरुन एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. काहीजणांकडून आजही राजकारण केले जातेय, पण मला त्यात भाग घेण्याची अजिबात इच्छा नाही, असेही ते म्हणाले.

First Published on: April 27, 2020 7:02 AM
Exit mobile version