बहुप्रतिक्षित ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोस देशभरात रवाना

बहुप्रतिक्षित ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोस देशभरात रवाना

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची देशातील जनता वाट पाहत होती, तो क्षण अखेर आला आहे. कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे डोस सीरम इन्स्टिटयूटमधून देशातील १३ शहरांकरता रवाना करण्यात आले आहेत. पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूटमधून कोव्हिशिल्ड लसीचे सहा कोल्ड स्टोरेज कंटेनर मोठ्या पोलिस बंदोबस्तात ४ वाजून ५५ मिनिटांनी रवाना झाले. यातील ३ कंटेनर हे पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना करण्यात आले. कोव्हिशिल्ड लसीच्या कोल्ड स्टोरेज कंटेनरची सीरम इन्स्टिट्यूटच्या परिसरात पूजा केली गेली. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते कोल्ड स्टोरेज कंटेरनरची हार घालून, नारळ फोडून पूजा करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला आहे. यानंतर हे कंटेनर देशभरात लसीचे डोस पोहोचवण्यासाठी रवाना करण्यात आले.

कोव्हिशिल्ड लसीचे डोस देशातील अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांत पुणे विमानतळावरुन रवाना करण्यात आले. तर दिल्लीसाठी कोविशिल्ड लसीचे डोस घेऊन पहिले विमान सकाळी ८ वाजता पुणे विमानतळावरुन रवाना झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या ८ विमानांपैकी २ कारगो फ्लाईट आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटकडून केंद्र सरकारने सोमवारी ११ लाख कोटी कोरोना लसीच्या डोसची खरेदी केली आहे. यानंतर सीरमने तात्काळ हे कोरोना लसीचे डोस देशभरात रवाना केले आहेत. कोव्हिशिल्ड लस ही भारतीय बनावटीची असून ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली आहे. तसेच या लसीची किंमत २१० रुपये प्रति डोस ठेवण्यात आली आहे.

First Published on: January 12, 2021 9:27 AM
Exit mobile version