औरंगाबादसह देशातील १३ विमानतळांचं लवकरच होणार नामकरण, कॅबिनेट मंजुरीसाठी प्रस्ताव येणार – डॉ. भागवत कराड

औरंगाबादसह देशातील १३ विमानतळांचं लवकरच होणार नामकरण, कॅबिनेट मंजुरीसाठी प्रस्ताव येणार – डॉ. भागवत कराड

औरंगाबाद, कोल्हापूर आणि शिर्डीसह देशातील १३ विमानतळांचं नामकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. नामकरणासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विमानतळाच्या नामकरणासंदर्भात एकूण किती विमानतळांचं नामकरण करायचं आहे, याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास १३ ठिकाणच्या विमानतळांचं नामकरण करण्यात येणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेताना सर्व देशातील विमानतळांचं नामाकरण होईल. तसेच या विमानतळाच्या इमीग्रेशन सेंटरसाठी मी प्रयत्न करत आहे, असं डॉ. भागवत कराड यांनी म्हटलंय.

औरंगाबाद येथून देशातील प्रमुख महानगरांमध्ये जाण्यासाठी लवकरच हवाई मार्गाने जोडले जाणार असून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला नवी संजीवनी मिळेल, असा विश्वास कराड यांनी व्यक्त केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भातला ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याबाबत अधिकृत अधिसचूना काढण्याची विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली होती.

मागील काही दिवसांपासून नामांतरावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने मात्र या मागणीला विरोध केला आहे. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आहे, नामांतरासाठी नाही, असे काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम म्हणाले होते. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नामांतरणाला विरोध असल्याचे बोलून दाखवले होते.


हेही वाचा : IND vs WI : तिसरा टी-२० सामन्यासाठी चाहत्यांना इडन गार्डन्समध्ये मिळणार प्रवेश, BCCI ने दिली परवानगी


 

First Published on: February 17, 2022 9:58 AM
Exit mobile version