धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री सदस्यांनी राबवले स्वच्छता अभियान

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री सदस्यांनी राबवले स्वच्छता अभियान

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे (१४ मे) औचित्य साधून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात बाराशे श्री सदस्य सहभागी झाले होते. या मोहिमेंतर्गत टपाल कार्यालय, पोलीस ठाणे, वन कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, तसेच हजरत मीरा मोहिद्दीन शाहबाबा चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्र या मार्गावर स्वच्छता करण्यात आली.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केलेले डॉ. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून खालापूर येथे सकाळी ७ वाजता ही मोहीम सुरू केली. यावेळी नगरपंचायत सफाई कामगारांनी देखील श्री सदस्यांच्या मदतीने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

तर पोलादपूर येथे १६७ श्री सदस्यांनी सहभाग घेऊन सुमारे ३२०० किलो कचरा गोळा केला. पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी शहरात स्वछता मोहीम राबविली. यामध्ये ५६ टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत पेणसह दादर, वरवणे, सापोली, हनुमान पाडा, वरसई, धावटे, वाशी, रावे, वडखळ, आंबिवली, भाल, वाशीनाका, जिते, शिर्की आदी बैठकांतील १ हजार ४७२ श्री सदस्य सामील झाले होते.

पाली येथे २ हजार ३३६ सदस्यांनी सहभाग घेऊन शहरात ४० टन कचरा जमा केला. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वांनी तोंडभरून कौतूक करीत डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अलिबाग मध्ये १७ शासकीय कार्यालयांची आणि ४६.२० किलोमीटर दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. ४ हजार ४३४ श्री सदस्यांनी सुमारे ७४ हजार चौरस मीटर क्षेत्रातील ४४.३२० टन कचरा गोळा केला. या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

First Published on: May 12, 2019 10:33 PM
Exit mobile version