शहापुरात प्रारूप विकास आराखडा बैठक संपन्न

शहापुरात प्रारूप विकास आराखडा बैठक संपन्न

शहापूर अघई रस्ता खचला

शहापूर । शहापूर शहराची नव्याने ओळख निर्माण होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडवून शहरात आवश्यक असणार्‍या सोयी सुविधा निर्माण करणे तसेच आरक्षणामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याचा प्राधान्याने विचार करून शहराचे रुपडे बदलण्याच्या दृष्टीने विविध सूचना आणि मागण्या शहापुरकरांनी मांडल्या. नगरपंचायत क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कार्यवाहीसाठी नगरपंचायतीने शहापुरात आयोजित केलेल्या बैठकीत तमाम शहापुरकरांनी उपस्थिती दर्शविली.

शहापुरात अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यावर कायम होणारी वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, घनकचरा व्यवस्थापनाची समस्या, सार्वजनिक शौचालयाअभावी महिला भगिनींची होणारी कुचंबणा आदी विविध कारणांमुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर शहराची नवीन ओळख व्हावी यासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यासंदर्भात शहापुरातील वैश्य समाज सभागृहात शहापूर नगरपंचायतीने बोलावलेल्या बैठकीत शहापुरकरांनी विविध सूचना तसेच मागण्या मांडल्या. भविष्यातील 25 वर्षांचा विचार करून शहरासाठी आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांनी सुरुवातीला स्पष्ट केले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरातील रस्ते रुंद करणे, नवीन व जोड रस्ते तयार करणे, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण, पार्किंगची सुविधा, फुटपाथ करणे, क्रीडांगणाची सुविधा तयार करणे, प्रशासकीय इमारत, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक निर्माण करणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा समस्या, सार्वजनिक शौचालय, यांसह शिक्षण व आरोग्य यासाठी आरक्षण, जलशुद्धीकरण केंद्र आदी नागरिकांना भेडसावणार्‍या विविध समस्या यावेळी मांडण्यात आल्या. या बैठकीला नगररचना विभागाचे किशोर पाटील, मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत उपस्थित होते. यावेळी राजेश खंबायत, अनिल निचिते, दिलीप भोपतराव, गोपाळ घरत, विवेक नार्वेकर, हरेश पष्टे, समीर माने, प्रकाश परांजपे, रमेश जगे, दत्ता धुमाळ, रणजित भोईर, डॉ. कामिनी सावंत, विनायक सापळे, योगिता धानके आदींनी विकास आराखडा बाबत सूचना केल्या.

बैठकीस नगरसेवक, लोक प्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी समस्यांचा आणि मागण्यांचा विचार करून प्रारूप विकास आराखडा तयार करून प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर हरकती मागविण्यात येणार असल्याचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांनी सांगितले.

First Published on: January 6, 2023 9:45 PM
Exit mobile version