आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावी; कॉंग्रेसची मागणी

आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावी; कॉंग्रेसची मागणी

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (ED CBI probe into allegations made by MLA Ravi Rana Demand of Atul Londhe)

“आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ५०-५० कोटी रुपये घेऊन आमदार गुवाहाटीला गेले होते अशी चर्चा राज्यभरात सुरु होती. त्यावर रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही”, असे अतुल लोंढे यांनी म्हटले.

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या एका पत्रावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याकडून चौकश्या झाल्या त्याच पद्धतीनं आता सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले-घेतले गेले याचीही ईडी, सिबीआय, इन्कम टॅक्स यांच्यामार्फेत चौकशी झाली पाहिजे. त्यातून राज्यातील सत्तांतराचे सत्य बाहेर येईल व अनेकांचे बुरखे फाटतील. या संस्थांनी जर या प्रकरणाची चौकशी केली नाही तर त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि त्या निष्पक्ष नसून सत्ताधा-यांच्या इशा-यावर फक्त विरोधकांना टार्गेट करत आहेत हे स्पष्ट होईल” असेही अतुल लोंढे म्हणाले.


हेही वाचा – टाटा बनवणार भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान

First Published on: October 27, 2022 6:02 PM
Exit mobile version