मुश्रीफ यांच्यावर ईडीचा फेरा कोल्हापूरमध्ये राडा

मुश्रीफ यांच्यावर ईडीचा फेरा कोल्हापूरमध्ये राडा

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर तसेच पुण्यातील घर, कार्यालय, साखर कारखाना, मुलींचे निवासस्थान अशा ७ ठिकाणी बुधवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाने (आयटी) छापेमारी केली. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी पोहचून ईडी तसेच आयटीच्या २० अधिकार्‍यांनी कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या छापेमारीमुळे मुश्रीफ यांच्या संतप्त कार्यकर्त्यानी कागल बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडत कारवाईमागे कागल तालुक्यातील भाजप पदाधिकार्‍याचा हात असल्याचा आरोप केला. हा पदाधिकारी गेले काही दिवस दिल्लीत चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी म्हणून मागणी करीत होता. त्यानुसार या पदाधिकार्‍याच्या एका कार्यकर्त्याने माझ्या कार्यकर्त्याला मुश्रीफ यांच्यावर येत्या ४ दिवसात ईडीची कारवाई होईल, अशी माहिती दिली होती, असा दावा मुश्रीफ यांनी केला.

ईडीकडून विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य – मुश्रीफ
पुन्हा छापेमारी कशासाठी हे मला समजत नाही. ईडीकडून विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केला. आधी नवाब मलिक आणि आता माझ्यावर ईडीने धाडी घातल्या आहेत. किरीट सोमय्या आता अस्लम शेख यांचे नाव घेत आहेत. त्यामुळे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे की काय, अशी शंका निर्माण होत असल्याचे मुश्रीफ म्हणाले. माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दूरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरू आहे. दीड-दोन वर्षांपूर्वीही ईडीने अशाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झाले नव्हते, असेही मुश्रीफ म्हणाले.

यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम करण्याचा प्रयत्न – जयंत पाटील
दरम्यान, विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्या विरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम तसेच नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या, मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही, असेही पाटील म्हणाले.

घोटाळे करताना धर्म आठवला नाही का?- किरीट सोमय्या
हसन मुश्रीफ यांनी घोटाळ्याचे १५८ कोटी रुपये स्वतःच्या, कुटुंबाच्या, जावयाच्या कोलकात्याच्या अनेक बोगस कंपन्या, शेल कंपन्यांमधून स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत घेतले. त्यानंतर ते पैसे सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर केले. हसन मियाँना आता धर्म आठवतो का? पैसे खाताना, भ्रष्टाचार करताना, गोरगरीब शेतकर्‍यांना लुटताना धर्म नव्हता आठवला, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

First Published on: January 12, 2023 2:00 AM
Exit mobile version