ईडीने अविनाश भोसलेंच्या मुलाचा नोंदवला जबाब, ६ ते ७ तास कसून चौकशी

ईडीने अविनाश भोसलेंच्या मुलाचा नोंदवला जबाब, ६ ते ७ तास कसून चौकशी

पुण्यातील प्रख्यात उद्योगपती व बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले सध्या ईडीच्या रडारवर आहेत. अविनाश भोसले यांच्या मुलाला ई़़डीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी समन्स बजावले होते. भोसले यांचा मुलगा अमित याची ईडीकडून सुमारे ६ ते ७ तास कसून चौकशी केली आहे. अविनाश भोसले यांना गुरुवारी समन्स बजावण्यात आले होते परंतु ते गैरहजर राहिले. अविनाश भोसले यांचा मुलगा अमितला शनिवारी पुन्हा चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तर अविनाश भोसले यांना सोमवारी चौकशीस उपस्थित राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहेत. ईडीकडून भोसलेंना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

आर्थिक गैरव्यवहार, तसेच अविनाश भोसलेंनी पुण्यातील एक एकर जागेवर बांधकाम केलं आहे. ती जमीन सरकारी आहे. यामुळे भोसलेंविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. २१ जूनला ईडीने कारवाई करत भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच फेमा कायद्यांतर्गत भोसलेंची नागपूर आणि पुण्यातील मालमत्ताही जप्त केली आहे. यापुर्वी विदेशी चलन प्रकरणात त्यांची दोनवेळा चौकशी करण्यात आली होती. त्याच प्रकरणात कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली होती.

बांधकाम विकासकाला ईडीकडून अटक

नवी मुंबईतील मोनार्क युनिवर्सल ग्रुपचे संचालक गोपाळ ठाकूर यांना शुक्रवारी ईडीने अटक केली आहे. ठाकूर यांच्यावर मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी सुमारे ५० कोटी रुपयांची ग्राहकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ठाकूर यांना न्यायालयाने ८ जुलै पर्यत ईडी कोठडी सुनावली आहे. गोपाळ ठाकूर हे नवीमुंबईतील बांधकाम विकासक आहे, मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपचे संचालक असणारे ठाकूर यांच्याविरुद्ध नवीमुंबईतील खारघर सह इतर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या आधारावर ईडीने गोपाळ ठाकूर याच्याविरुद्ध मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. तपासात ठाकूर यांच्या कंपनीने अनेक ग्राहकांना घरे विकून ग्राहकांना न सांगता या घरावर कोट्यवधींचे कर्ज घेतले असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तसेच कंपनीच्या खातेअंर्तगत अनेक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून सुमारे ५० कोटी रुपयाचा हा आकडा असल्याचे समजते. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी गोपाळ ठाकूर याना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ८ जुलै पर्यत ईडी कोठडी सुनावली आहे.

First Published on: July 2, 2021 11:18 PM
Exit mobile version