सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालावर 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालावर 
गेल्या चार दिवसांपासून राज्यातील तब्बल १८ लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्यात यावी, यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामध्ये राज्यातील शिक्षक संघटना सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे आता दहावी-बारावीच्या ७५ लाख उत्तरपत्रिका तपासणीशिवाय पडून राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. शिक्षक संघटना सुद्धा या संपात सहभागी झाल्याने दहावी आणि बारावीचा निकाल हा वेळेपेक्षा एक ते दोन आठवडे उशीरा लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये शिक्षक संघटना सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. या शिक्षक संघटनांनी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस हा संप सुरू राहिला तर आणखी काही उत्तरपत्रिकांची यामध्ये भर पडू शकते.
१४ मार्चला हा संप सुरू झाल्यानंतर दहावीचे एकूण पाच विषयांचे पेपर होणे बाकी होते. त्यामुळे हे पेपर होऊनसुद्धा हा संप सुरूच राहिला तर दहावीचा निकाल जुलै महिना सुद्धा उजाडू शकतो. साधारणतः दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागणे अपेक्षित असते. परंतु, शिक्षक संघटनांनी संप पुकारत घेतलेल्या भूमिकेमुळे हा निकाल लांबला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – लालबाग हत्याकांडचं यूपी-बंगाल कनेक्शन, ‘त्या’ दोन वेटर्सपैकी एकाला अटक
दरम्यान, या संपामध्ये राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीने या संपामध्ये सहभाग घेतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे संपात सहभागी झालेल्या काही शिक्षक संघटनांनी बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरीक्त ते अन्य कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. या संपामुळे फक्त विद्यार्थ्यांचेच नाही तर रूग्णांचे देखील अतोनात हाल होत आहेत. सरकारी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
First Published on: March 17, 2023 3:19 PM
Exit mobile version