विधानसभा अध्यक्ष निवडणूक: मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रविवारी भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे राज्यपाल उद्या काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, 28 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रविवारी राजभवनावर आले होते. या तिन्ही नेत्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांना सरकारचा प्रस्तावही सादर केला. या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधून चर्चेची माहिती दिली.

अध्यक्षांविना विधानसभा कशी ठेवणार?

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांना मंजुरी द्यायची आहे. ती द्यावी म्हणून आम्ही त्यांना भेटलो. त्यांना विनंती केली आहे. उद्या कार्यक्रम जाहीर करण्यास मुभा द्यावी, असे त्यांना सांगितले. आम्ही जे काही बदल केले आहेत. त्याबद्दल त्यांनी फार विचारणा केली नाही. लोकसभेत जी पद्धत आहे तीच पद्धत विधानसभेसाठी घेतली आहे. विधान परिषदेची पद्धतही जवळपास तीच आहे. त्यामुळे आपण काही चुकीचे किंवा वेगळे केले असे नाही. त्यांना काही माहिती घ्यायची आहे. ती घेतो आणि कळवतो असे त्यांनी सांगितले आहे, असे थोरात यांनी सांगितले. राज्यपालांना काही माहिती घ्यायची असेल तर घेतील आणि आम्हाला मान्यता देतील. बिगर अध्यक्षांची विधनासभा कशी ठेवता येईल. ते सीनियर नेते आहेत. त्यांना खूप अनुभव आहे, असेही ते म्हणाले. 12 निलंबित आमदारांबाबत काही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल सकारात्मक

राज्यपालांनी जे पत्र दिले होते सरकारला अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे. त्यानुषंगानेच आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र त्यांना दिले. ही निवडणूक दोन दिवसात व्हावी. कायम अध्यक्ष विधानसभेला असणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही मागणी केली आहे. राज्यपालांची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत कायदेशीर चर्चा करून उद्या निर्णय कळवतो, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. अशा घटना घडतात तेव्हा त्यांची भूमिका महत्वाची असते. ते सकारात्मक निर्णय घेतील, असे आम्हाला वाटते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


 

First Published on: December 27, 2021 3:30 AM
Exit mobile version