”जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरो मे अटके है उनके मूह से खंजीर की बात अच्छी नही लगती”

”जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरो मे अटके है उनके मूह से खंजीर की बात अच्छी नही लगती”

मुंबईः खंजीर खुपसलं, खंजीर खुपसलं, पाठीत खंजीर खुपसलं, हे जे काही वारंवार बोललं जातंय, मी त्याच्यावर असं बोलू शकतो, जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरो मे अटके है उनके मूह से खंजीर की बात अच्छी नही लगती, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. एकनाथ शिंदे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे मी योग्य वेळ आली की नक्की बोलेन, आज बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांच्या बरोबर प्रतारणा कोणी केली हे सर्वश्रुत आहे, असाही हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलाय. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेदरम्यान बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत आहेत. त्यालाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दुसरीकडे काल उद्धव ठाकरेंनीही मुंबईत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. भाजपला शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवायचे आहे. त्यामुळे बंडखोरांना हाताशी धरून हा घाट घातला गेला. पण हे सोपे नाही. जे फुटले आहेत त्‍यांना कोणत्‍या ना कोणत्‍या तरी पक्षात विलीन व्हावेच लागेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. जे बाहेर पडलेत त्‍यांच्यात जर खरंच मर्दुमकी असेल तर त्‍यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता स्‍वतःच्या नावावर मते मागावीत, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. शिवडी विधानसभा मतदारसंघातील नवीन शाखेचे उद्घाटन रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, सचिन अहिर, अजय चौधरी आदी उपस्‍थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे बोलत होते.

भाजपला मुंबईवरचा भगवा शिक्‍का पुसून स्‍वतःचा शिक्‍का उमटवायचा आहे. पण ते सोपे नाही. कारण आता हळूहळू सर्व चित्र स्‍पष्ट होते आहे. जे गेलेत त्‍यांच्यासोबत कोणी नाही. कारण त्‍यांना असामान्य बनविणारा शिवसैनिक आज आमच्यासोबत आहे. आता पुन्हा सामान्यांतून असामान्य बनवायचे आहे. २७ तारखेला माझा वाढदिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी पुष्‍पगुच्छ घेऊन येऊ नका तर शपथपत्र आणि सदस्‍य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या, असे आवाहन ठाकरे यांनी केले.


हेही वाचाः द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदी होणार विराजमान, शपथविधीची जय्यत तयारी

First Published on: July 25, 2022 9:04 AM
Exit mobile version