शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, रामदास कदम यांची नेतेपदी पुनर्नियुक्ती

शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, रामदास कदम यांची नेतेपदी पुनर्नियुक्ती

एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी आधीच शिंदेंनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यानुसार त्यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली असून नव्या कार्यकारिणीनुसार एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती झाली असून आजच हकालपट्टी झालेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पुन्हा शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने माध्यमांसमोर दिसणाऱ्या दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्षप्रमुख पदाला शिंदे गटाने हात लावला नाही. (Eknath Shinde declare national Executive released)

गेल्या काही दिवसांपासून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लागलीच कदमांची पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. मात्र, मूळ शिवसेना आमचीच आहे, असं दाखवत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये अनेकांना जुन्या कार्यकारिणीप्रमाणेच नियुक्ती दिली आहे. मात्र, पक्षप्रमुख पदासाठी कोणाची नियुक्ती केलेली नाही.

कोणाला कोणते पद

यांची उपनेतेपदी निवड

यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच

बंडखोरांच्या गटातील अनेक आमदार, नेत्यांना नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. जुनी कार्यकारिणी बरखास्त करताना शिंदेंनी पक्षप्रमुख मात्र बदलला नाही. त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे मूळ शिवसेना आमचीच असा दावा करत असलेल्या शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदावरून हटवले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक आज हॉटेल ट्रायडेंट येथे पार पडली. या बैठकीत आमदारांसह अनेक खासदारही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले की, सगळेच खासदार आमच्या संपर्कात आहे, असं मला वाटतं. त्यामुळे आमदारांसह आता खासदारही शिवसेनेला सोडून शिंदे गटात सामील होणार का हे पाहावं लागेल.

First Published on: July 18, 2022 5:13 PM
Exit mobile version