सावरकरांवरील वक्तव्याविरोधात ठाण्यात शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध

सावरकरांवरील वक्तव्याविरोधात ठाण्यात शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध

ठाणे :  भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात ठाण्यात शिंदे गटाने टेंभी नाका येथे आंदोलन केले. यावेळी राहुल गांधीच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर सावरकरांच्या संदर्भात अशी वादग्रस्त विधानं खपवून घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

टेंभीनाका परिसरात झालेल्या आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील हिंगोली येथे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. यावर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असताना, ठाण्यातही टेंभी नाका परिसरात राहुल गांधीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

तर, स्वतः बाळासाहेब ठाकरे हे सावरकर यांच्या विचारांना मानणारे होते. त्यांच्या विरोधात कोणी वादग्रस्त विधान केले तर स्वतः बाळासाहेब मैदानात उतरले होते. मात्र त्यांचे युवराज आज राहुल गांधी यांची गळाभेट घेत असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी केली आहे. सावरकरांच्या संदर्भात अशी वादग्रस्त विधान खपवून घेणार नसल्याचा इशारा म्हस्के यांनी यावेळी दिला.


हेही वाचा : भारत जोडो यात्रा : शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर.., युवा काँग्रेसचा इशारा


 

First Published on: November 17, 2022 7:52 PM
Exit mobile version