आरोग्यमंत्री तानाजी सावंतांबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मी त्यांना शिक्षणमंत्री…’

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मी त्यांना शिक्षणमंत्री…’

ठाणे जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आज (22 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य केले. विशेष म्हणजे सध्याचे आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंतांबाबतही मुख्यमंत्री शिंदेंनी गौप्यस्फोट केला आहे. (Eknath Shinde Tanaji Sawant Education Minister Cause Controversy)

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“मी तानाजी सावंत यांना महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये शिक्षणमंत्री करणार होतो. परंतु वादाच्या भीतीने तसं करू शकलो नाही. तानाजीराव मघाशी म्हणत होते की, त्यांनी साखरेत डॉक्टरी केली आहे. तुम्ही साखरेत डॉक्टरी केल्यामुळे खूप लोकांची शुगर (साखर) वाढली आहे. तानाजीराव, तुमच्या शैक्षणिक संस्थादेखील खूप आहेत. सुरुवातीला मी असा विचार केला होता की, तुम्हाला शिक्षणमंत्री करायचं. पण मग ज्याच्या शिक्षणसंस्था जास्त त्याला शिक्षणमंत्री केलं तर कॉन्ट्रोव्हर्सी (वाद) होते. म्हणून तसं करता आलं नाही. सामान्य माणसाला सेवा देणारा हा आरोग्य विभाग आहे. तुम्ही या विभागात उत्तम काम करत आहात”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“आपण उभारत असलेल्या या नव्या रुग्णालयामुळे हजारो, लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय आपलं सरकार आरोग्याच्या क्षेत्रात मोठं काम करत आहे. आपण रुग्णवाहिका वाटप करतोय, राज्यात हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. परंतु आपल्या या कामांमुळे अनेकांना पोटदुखी होत आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत उपचार केले जातील”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


हेही वाचा – मी कारखानदार पण अजित पवारांसारखा नाही, ठाण्यातील कार्यक्रमात तानाजी सावंतांची टीका

First Published on: April 22, 2023 6:17 PM
Exit mobile version