..म्हणून केली त्रिसदस्यीय प्रभाग रचना – एकनाथ शिंदे

..म्हणून केली त्रिसदस्यीय प्रभाग रचना – एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यात त्रिसदस्यीय प्रभाग रचनेला मंजूरी देण्यात आली. ही प्रभाग रचना नागरी सुविधांसह विकास कामांच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई वगळता इतर सर्व महापालिका निवडणुकांना ही प्रभाग रचना लागू राहणार आहे.

एक सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा होताच त्याला सर्वच पक्षांकडून जोरदार विरोध झाला होता. कारण यात आरक्षण, युती आणि आघाडी अशी सर्वच समीकरणे बिघडणार होती. त्यामुळेच काहींनी चार सदस्यीय प्रभागाचा विचार मांडला होता. मात्र, मंत्रिमंडळातील काही नेत्यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचना योग्य ठरणार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं.

नगरपरिषद आणि नगरपालिकेत दोन, तर नगर पंचायतीमध्ये १ सदस्य प्रभाग रचना राहणार आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांना नागरी सुविधा देणं अधिक सोपं होईल. हा निर्णय महाविकास आघाडीने एकमताने घेतल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नागरिकांना सुविधा देण्यासाठी ही प्रभाग रचना अधिक चांगली ठरेल. तसेच, योग्य प्रकारे निधीचं वाटपही करता येईल. तीन प्रभागात महाविकास आघाडीला सामावून घेता येईल, असंही शिंदेंनी सांगितलं.

या महापालिकांत निवडणुकीचे पडघम

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.

First Published on: September 22, 2021 11:59 PM
Exit mobile version