कण मातीचे रगडता सोनेही मिळे!

कण मातीचे रगडता सोनेही मिळे!

अनेकजण पहाटेच्या सुमारास साखर झोपेत असताना शमिता आणि तिच्या सोबत आणखी काही जणींचा दिवस सुरू होतो. कल्याणहून खोपोलीला येणारी 5.15 ची लोकल पकडून खोपोलीत 6.30 वाजता पोहचून मुख्य बाजारपेठ गाठायची. इथून सुरू होतो त्यांचा दिवस..

बाजारपेठेतील बंद सुवर्णपेढीसमोर शमिता आणि तिच्या सहकार्‍यांना पोटापाण्याची सोय होण्याची आशा असते. पेढीच्या शटर समोरील मातीत त्यांचा रोजगार दडलेला असतो. हातात असलेला पलटी पत्रा, तारेचा ब्रश, झाडू आणि घमेलं घेऊन त्यांची कामाला सुरूवात होते. पेढी समोरील माती, सध्या पावसाने झालेली चिखल माती, घमेल्यात गोळा करायची. रस्त्यावरील संपूर्ण खरवडून काढलेली मातीही घमेल्यात गोळा करायची. झाडूच्या सहाय्याने पेढीच्या शटरपासून पुन्हा झाडून जमा झालेला कचरा, माती घमेल्यात भरायची. नंतर जवळच्या थैलीत सर्व जमा झालेला मातीयुक्त कचरा भरायचा.
शमिता सोबत आलेल्या सर्वजणींचा शहरातील जेवढ्या सुवर्ण पेढ्या आहेत तेथे हा उद्योग सुरू असतो. वर्दळ सुरू होण्यापूर्वी पेढी समोरील घेतलेल्या मातीत पोटापाण्याची सोय झालेली असते. सुवर्ण पेढीवर दिवसभरात कारागीर काम करीत असताना निघालेले बारिक सोन्याचे कण पेढीतून झाडलोट करताना कचर्‍यात जातात. दृष्टीस पडणार नाहीत अशा लपलेल्या सुवर्ण कणात शमितासारखींच्या पोटपाण्याची सोय होते. जमा केलेली माती कल्याणला नेली जाते. वाहत्या नाल्याच्या पाण्यात विशिष्ट प्रकारच्या जाळीत माती धुवावी लागते.

किलो-किलोभर माती वाहत्या पाण्यात धुवताना जमा होणारे कणभर सोनं त्यांच्या कटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करते. या मातीतून कधी तीनशे ते चारशे रुपये मिळतात. कधी कर्जत, कधी खोपोली, कधी आणखी मोठ्या शहातील मातीत दडलेला रोजगार शोधणार्‍या शमितासारख्या महिला नकळत स्वच्छतेचेही काम करून जातात.

पावसाळ्यात माती ओलसर असते. इतर मोसमात पेढीसमोरील रस्त्याचा अर्धाअधिक भाग झाडून, घासून काढतो. 20 जणींचा गट असतो. केव्हा तरी मुलं देखील मदतीला येतात. कधी तीनशे, तर कधी चारशे रुपयांची कमाई होते. शहारातील सफाई कामगारांचे काम सुरू होण्यापूर्वी आम्ही कामाला सुरूवात करतो.
-शमिता शेटे, कल्याण

First Published on: September 23, 2019 1:34 AM
Exit mobile version