निवृत्तीनाथ महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश; प्रति जेजूरी शेंगुड गावात भंडारा उधळत जोरदार स्वागत

निवृत्तीनाथ महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश; प्रति जेजूरी शेंगुड गावात भंडारा उधळत जोरदार स्वागत

 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्तीनाथांच्या पालखीने अहमदनगर जिल्हा सोडत वाटचाल करत कोरेगाव, शेगुड, रावगाव करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर खंडोबाचे शेगुड या नावाने हे गाव प्रसिद्ध आहे. याला प्रति जेजुरी देखील म्हटले जाते. महाराष्ट्रातील १२ खंडोबांची स्वयंभू स्थाने आहेत त्यात याची नोंद होते.

आख्यायिका म्हणजे येथे स्वयंभू मूर्ती असल्याचे येथील गावकर्‍यांनी सांगितले. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळा स्वागताची परंपरा शेकडो वर्षांपासून येथे चालत आलेली आहे. खंडोबा मंदिर परिसरात दुपारी ३ वाजे दरम्यान उन्हाच्या प्रचंड उकाड्यात पालखी सोहळ्याचे आगमन झाले. प्रथम मंत्रोच्चारात पालखीचे यजमानांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी खंडोबा नगरीत असल्यामुळे पालखीवर भंडारा उधळत स्वागत करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात वारकर्‍यांनी जय जय राम कृष्ण हरीचा गजर केला.

प्रचंड ऊन असून देखील वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर कमालीचा उत्साह दिसत होता. फक्त विठ्ठल भेटीची आस हा तणाव दूर करत होती. बँड पथक, वाघे मुरळी, डीजे अशी वेगवेगळी वाद्ये लावून पालखी गावात येताच येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे अभूतपूर्व असे स्वागत येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. गावात लावलेल्या कमानीवरून ५०० किलो भंडार्‍याची मुक्त उधळण संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यावर करण्यात आली. जणू काही आपण जेजुरी मध्येच आलो आहोत की काय असा क्षणभर भास वारकर्‍यांना होत होता. जशी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी वरून पुणे मार्गे पंढरपूरला जाते व तिचे स्वागत जेजुरी संस्थानच्या वतीने भंडारा उधळून केले जाते तसेच स्वागत प्रति जेजुरी असलेले या शेगुड गावात करण्यात आले.

महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ वारकरी, टाळकरी, पालखीचे मानकरी, बैल जोडीचे मानकरी, सेवाधारी, संस्थांनचे विश्वस्त या सर्वांचे अगत्यपूर्वक स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याने वारकरी देखील भारावून गेले होते. पालखी सोहळा या गावात ३ तास रंगून गेला होता. फुगड्या, भारुड, अनेक ज्येष्ठ वयोवृद्ध वारकरी देखील भजनासह पारंपारिक वारीतील खेळाचा आनंद घेत होते. पांडुरंगाचे भजन बरोबरच निवृत्तीनाथांची वारी आली मल्हारीच्या दारी हा अभंग देखील यावेळी टाळ-मृदंगाच्या तालावर हजारो वारकरी गात होते. वारकरी देखील एकमेकाला भंडारा लावत आनंद घेत होते.

यावर्षी विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, स्वतंत्र विसावा मंडप, पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह व विसावा मंडप तसेच त्यात टेबल फॅन, सिलिंग फॅन या सर्व सुविधा थेट पंढरपूरपर्यंत असणार आहेत. वयोवृद्ध वारकर्‍यांसाठी फूट मसाजची देखील व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. एकूणच ही वारी आता हायटेक झाली असून तरुणांची संख्या देखील आता वारीत वाढली असल्याचे दिसते आहे.

पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर अनेक संतांच्या दिंड्यांची भेट होत असते. कारण सर्व दिंड्या सोलापूर महामार्गावरून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर वारकर्‍यांना दिलासा मिळतो. कारण तिथून पुढे आठवडाभरातच पंढरपूर समीप आलेले असते. दरम्यान पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर अहमदनगर येथील जिल्हाधिकार्‍यांनी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांकडे पालखीचे हस्तांतरण केले. यावेळी तहसीलदार दिनेशकुमार जाधव, बी.डी.ओ. मनोज राऊत, कृषी अधिकारी संजय वाकडे, मनोज राऊत, कृषी अधिकारी संजय वाकडे आदींसह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्यात यावर्षी ४७ नोंदणीकृत दिंड्या सहभागी असून अहमदनगरपासून पुढे आपापल्या परीने गावगावचे वारकरी सामील होत आहेत. आता वारीतील वारकर्‍यांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पालखीतळावर वारकर्‍यांसाठी प्रथमच संपूर्ण आषाढी वारीच्या इतिहासात वारकर्‍यांच्या सोयीसुविधांसाठी शासन दखल घेत आहेत. संस्थानने शासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने समाधान वाटत आहे. : ह.भ.प. निलेश महाराज गाढवे, अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान

First Published on: June 24, 2023 2:32 PM
Exit mobile version