युती झाली तरी भाजपची श्रेयाची लढाई सुरुच

युती झाली तरी भाजपची श्रेयाची लढाई सुरुच

खार (प) येथील महापालिकेच्या पशुवैद्यकीय सेवेचे मुख्यालय व पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येत आहे. मात्र, सोमवारी सायंकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आपल्या नगरसेवक व पदाधिकार्‍यांसह भूमीपुजनाचा कार्यक्रम आटपून घेतला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती झालेली असताना शिवसेनेसोबत अधिकृत भूमिपुजन करण्याऐवजी अशाप्रकारे भाजपासोबत भूमीपुजन करून शेलारांनी आपल्याला युती मान्य नसल्याचे दाखवून दिले.

खार पोलीस स्टेशन व पशुवैद्यकीय रुग्णसेवेच्या इमारतीचे नुतनीनकरण करण्याच्या कामाचे भूमीपुजन भाजपचे आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह सोमवारी सायंकाळी केले. ‘भूमीपुजन: जनसेवेच्या इमारतीचे!निमत्रण: ‘खार’च्या प्रगतीचे!’ अशाप्रकारची निमंत्रण पत्रिका छापून त्यांनी खारमधील नागरिकांना याचे निमंत्रण दिले होते. या भूमीपुजनप्रसंगी माजी उपमहापौर अलका केरकर, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह मुंबई सचिव अजित मण्याल, वॉर्ड अध्यक्ष अजित गुरव, हरिश्चंद्र मोरु, गजेंद्र घोडके, सुषम शेवाळे, सत्यनारायण निर्मल, प्रशांत राऊत आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

खार येथील या नव्या इमारतीमध्ये पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे मुख्यालय असणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर प्राण्यांसाठी क्ष-किरण, सोनोग्राफी इत्यादी सोयी सुविधा असणारा अत्याधुनिक दवाखाना, तर पाचव्या मजल्यावर प्राण्यांपासून माणसांना होणार्‍या रोगांच्या निदानाकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळा असेल. याबाबतचा कामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून त्याला स्थायी समितीची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार येथील सर्व कार्यालये अन्य जागांमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने महापालिकेच्यावतीने अधिकृत भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महापालिकेच्यावतीने भूमीपुजनाचा कार्यक्रम होण्यापूर्वी सोमवारी भाजपने भूमीपुजन करून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

मागील विधानसभेत व महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्याने दोन्ही पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरु होती. त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या विभागांमध्ये महापालिकेच्या विकासकामांचे भूमीपुजन व उद्घाटन स्वत:च करून याचे श्रेय भाजप घेत असे. परंतु आता दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्यानंतरही भाजपकडून केल्या जाणार्‍या या प्रयत्नांमुळे भाजपाच्या नेत्यांमधील श्रेयाची लढाई आजही सुरुच असल्याचे दिसून येते. या पशुवैद्यकीय सेेवेच्या इमारतीचे काम आपल्या प्रयत्नातून होत असल्याचे सांगत शेलारांनी याचे श्रेय स्वत:च घेण्याचा प्रयत्न केला. आमदार म्हणून आणि पक्षाचा मुंबई अध्यक्ष म्हणून शेलारांनी केलेले हे वर्तन म्हणजे त्यांना युती अमान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मात्र, हे अधिकृत भूमीपुजन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खार येथील अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना व पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने केल्या जाणार्‍या या विकासकामाचे भूमीपुजन महापौरांची वेळ मागवून भाजपचे नेते आशिष शेलार आणि त्यांच्या नगरसेवकांनी शिवसेनेसोबत संयुक्तपणे आणि अधिकृत केले असते तर संयुक्तिक ठरले असते, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट करत श्रेयापेक्षा युतीधर्म महत्वाचा असे म्हटले आहे.

First Published on: February 26, 2019 4:23 AM
Exit mobile version