झाडू अन् व्हॅक्युम क्लिनरच्या जमान्यातही केरसुणीचा मान

झाडू अन् व्हॅक्युम क्लिनरच्या जमान्यातही केरसुणीचा मान

प्रमोद उगले । नाशिक

झाडू, मॉप, रोपो क्लिनर आणि व्हॅक्युम क्लिनरच्या जमान्यातही लक्ष्मी स्वरुप मानल्या जाणार्‍या पारंपरिक केरसुणीने आपला मान कायम ठेवला आहे. यंदा पावसाचा फटका बसल्याने केरसुण्यांचे दरही वाढले आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टीचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळीसारख्या सणउत्सवांत दिसून येते. लक्ष्मीपुजनात आवर्जून स्थान असणार्‍या केरसुणीमुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दिवाळी खरेदीत आकाशकंदील, पणत्या, फटाके आणि कपड्यांसोबत केरसुणीचाही समावेश असतो. घर झाडण्यासाठी पूर्वी पारंपरिक पद्धतीने वापरली जाणारी फडाची केरसुणी आता दुर्मिळ होऊ लागली आहे. त्यामुळे केरसुणी बनविणारे अन्य व्यावसायांकडे वळले आहेत. मात्र, काही व्यक्तींनी आजही पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवला आहे. अनेक वर्षांपासून दिवाळी सणात धनत्रयोदशीला केरसूणीची खरेदी करून लक्ष्मीपूजनाला तिची पूजा केली जाते. पावसामुळे केरसुणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य भिजल्याने केरसुणीचे भाव २० टक्क्यांनी वाढले आहेत. असे असतानाही मोठ्या कष्टाने केरसुणी बनविणार्‍या कारागिरांच्या हाती फार काही पडत नाही. लक्ष्मीस्वरुप केरसुणी बनविणार्‍यांचे हात मात्र लक्ष्मीपासून वंचित राहत असल्याचेच यातून दिसते.

अशी बनते केरसुणी !

केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाते. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी तयार केली जाते. जंगलांमधून शिंदीची झाडे संपुष्टात येत असल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. दिवाळी सणामध्येच केरसुणी बनवण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीमध्ये दिवसाला ४० ते ५० केरसुण्या बांधल्या जातात. यातून मिळणारा मोबदला मात्र किरकोळच असतो. केरसुणी ६० ते ८० रुपयांना विकली जाते. तर, आधुनिक झाडुची किंमत १५० ते २०० रुपयांच्या घरात आहे.

संततधार पावसामुळे तयार केरसुण्याही भिजल्या आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीत केरसुणींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा काही प्रमाणात किमतीही वाढू शकतात. : भाऊसाहेब शिरसाठ, विक्रेते

First Published on: October 18, 2022 3:55 PM
Exit mobile version