राऊतांमुळे खासदारांचही बंड; बंडाच्या केंद्रस्थानी नाशिकच

राऊतांमुळे खासदारांचही बंड; बंडाच्या केंद्रस्थानी नाशिकच

नाशिक : आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपबरोबर युती करावी अशी आग्रही मागणी संबंधित खासदारांनी केली असली तरी खासदार संजय राऊत यांच्यावरील नाराजी हेच या बंडाचे मूळ कारण असल्याचे बोलले जाते. महत्वाचे म्हणजे खासदारांच्या बंडात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही समावेश आहे.

शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार सोबत घेऊन बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटाला समर्थन देण्याची शक्यता असून खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १४ खासदारांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदारांच्या बंडाची सुरूवात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेनेच्या खासदारांनी केली. यात खासदार गोडसे यांचाही सहभाग होता. खासदारांच्या आग्रहास्तव सेेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही खासदार वेगळी वाट धरण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. सेनेचे १४ खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हेदेखील ही सहभागी होण्याची शक्यता असून शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

खासदारांनी हे बंड भाजपसोबत युती करण्याच्या आग्रहासाठी सुरू केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी बंड करू पाहणारे खासदार ‘ऑफ दी रेकॉर्ड’ बोलताना खा. राऊतांविषयी नाराजी व्यक्त करताना दिसतात. भाजपसोबत युती होऊ न देण्यात खा. राऊतांचाच मोठा हात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खा. राऊतांचाच प्रभाव असल्याने तेदेखील युती करण्यास पुढे धजावत नसल्याचे खासदार सांगतात. खा. राऊतांनी उद्धव यांचा बुद्धीभेद केला असल्यानेच हे त्रांगडे निर्माण झाल्याची बाब खासदार नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगत आहेत.

बंडाच्या केंद्रस्थानी नाशिकच

राजकीयदृष्टया नाशिक नेहमीच केंद्रस्थानी राहीले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मत बाद झाल्याने आमदार कांदे चर्चेत आले. या निवडणुकीनंतर काही तासांतच मुख्यमंत्री शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारत सेेनेला हादरा दिला. या बंडाला सर्वप्रथम आमदार कांदे यांनी पाठिंबा दर्शवत ते शिंदे गटात सहभागी झाले. सुरूवातीला पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत दिसणारे मालेगावचे आमदार तथा माजी कृषीमंत्री दादा भुसे हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याने नाशिकमधून शिवसेनेला दुसरा हादरा बसला. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेकडेही सार्‍यांचे लक्ष होते. झिरवाळ दिंडोरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यानंतर आता खासदार गोडसेंच्या रूपाने सेनेला नाशिकमधून पुन्हा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना भाजप ही नैसर्गिक युती आहे. जनमताचा कौलही युतीच्या बाजूने असताना राष्ट्रवादी , काँग्रेससोबत आघाडी ही जनतेलाही रूचलेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधील अडीच वर्षांचा कार्यकाळातील अनुभवही चांगला नव्हता. शिवसेनेने भाजपसोबत जावे याबाबत सर्व खासदारांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आता आम्ही जी भूमिका घेऊ ती समोर येईलच. : खासदार हेमंत गोडसे

भुजबळांशी वाद

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तेत असूनही सेना आमदारांचे आघाडीतील मंत्र्यांशी खटके उडाले. निधी वाटपावरून माजी पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. याप्रकरणी कांदे यांनी थेट माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली. मात्र पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले. तेव्हापासून कांदे नाराज होते. सिपॅट प्रकल्पाच्या जागेच्या मुद्द्यावरुन खासदार गोडसे-भुजबळ यांच्यात वाकयुध्दही रंगले. अशा अनेक कारणांनी नाशिक कायम चर्चेत राहीले.

नाराजीची कारणे

First Published on: July 19, 2022 2:07 PM
Exit mobile version