भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना पत्नीसह अटक, जामिनावर लागलीच सुटका!

भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना पत्नीसह अटक, जामिनावर लागलीच सुटका!

पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्यासह अटक करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणी काकडे पती-पत्नीला गुरुवारी सकाळी चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. मात्र त्यानंतर दोघांचीही न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले (वय ४०) यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ढमाले यांनी फिर्याद दिली आहे. चतुशृंगी पोलिसांनी काकडे दाम्पत्याला आज सकाळी अटक केल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता दोघांचीही जामीनावर सुटका करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

ढमाले यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी संजय काकडे यांच्यासोबत भागीदारी केली होती. काही काळ व्यवसाय देखील झाला. मात्र, काही काळानंतर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे २०१०मध्ये दोघांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

ऑगस्ट २०१८ मध्ये ढमाले संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी ‘तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल’, अशा शब्दात फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

First Published on: November 5, 2020 5:24 PM
Exit mobile version